• Wed. Nov 5th, 2025

मुकबधीर विद्यार्थ्यांनी लुटला सितारे जमीनपर चित्रपटाचा आनंद

ByMirror

Jul 14, 2025

विशेष विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी सेवाप्रीतचा उपक्रम; शिक्षकांचा सन्मान


विशेष मुलांमध्येही अनेक अद्वितीय क्षमता -जागृती ओबेरॉय

नगर (प्रतिनिधी)- सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने विशेष म्हणजेच मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी सितारे जमीनपर हा हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी चित्रपट कोहिनूर मॉलच्या चित्रपटगृहात दाखविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन सेवाप्रीत फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी केले होते.


वडगाव गुप्ता रोड, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मुकबधीर विद्यालय व वस्तीगृहातील 50 विद्यार्थी आणि शिक्षकांनी या चित्रपटाचा आनंद घेतला. चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्‍वास, आशावाद आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उमेद जागविण्यात आली. चित्रपटादरम्यान मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.


यावेळी सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख निशा धुप्पड, अर्चना खंडेलवाल, अन्नू थापर, गीता नय्यर, गीता माळवदे, बबीता जग्गी, नताशा धुप्पड, गीता धुप्पड, अर्चना ओबेरॉय, रिटा बक्षी, विना खुराणा, डॉ. सोनाली वहाडणे, बब्बू धुप्पड, संगीत ॲबट, मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप जगधने आदींसह महिला सदस्या व विद्यार्थी उपस्थित होते. विशेष मुलांना एक प्रेरणादायी अनुभव देण्यासाठी सर्व महिला सदस्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून योगदान दिले.


जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, देवाने प्रत्येकाला काही कमी-जास्त गुण दिले आहेत. कोणीही परिपूर्ण नसतो. पालक व शिक्षक विद्यार्थ्यांतील चांगले गुण ओळखून त्यांना योग्य दिशा दिल्यास ते जीवनात नक्कीच यशस्वी होतात. विशेष मुलांमध्येही अनेक अद्वितीय क्षमता असतात. त्या क्षमतांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमात विशेष मुलांना शिकवणाऱ्या आणि त्यांच्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या शिक्षकांचा सेवाप्रीत फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. विशेष मुलांचे संगोपन व शिक्षण हे मोठ्या समर्पणाचे कार्य असून, या मुलांसाठी झटणाऱ्या पालकांच्या जिद्दीला सेवाप्रीतच्या वतीने सलाम करण्यात आले.


या उपक्रमास श्‍वेता गांधी यांचे सहकार्य लाभले. सेवाप्रीतच्या वतीने वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासाठी स्टीलच्या ताटांची भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना चित्रपटाची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुकबधीर विद्यालय व वस्तीगृहाच्या वतीने सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *