• Wed. Mar 18th, 2026

सुरतमध्ये दांडी सी फूड फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Mar 18, 2026

कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर यांच्या हस्ते उद्घाटन

मच्छीखवय्यांची मेजवानी; मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला खाद्यसंस्कृतीचा जल्लोष

गुजरात (प्रतिनिधी)- सुरत येथे आयोजित दांडी सी फूड फेस्टिवल 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या भव्य फेस्टिवलचे उद्घाटन कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, हजारो मच्छीप्रेमींनी विविध प्रकारच्या सी फूडचा आस्वाद घेतला.
फेस्टिवलमध्ये विविध पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या माशांच्या पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. कोळी समाजाच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. खास करून समुद्री खाद्यपदार्थांच्या विविध चवींचा आस्वाद घेत मच्छीखवय्यांनी या फेस्टिवलचा मनसोक्त आनंद लुटला.


या सोहळ्याबाबत माहिती देताना वाळकी गावचे सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सांगितले की, अशा प्रकारचे फेस्टिवल स्थानिक संस्कृती आणि खाद्यपरंपरा जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून आयोजकांना शुभेच्छाही दिल्या.


कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला मत्स्य व्यवसाय मंत्री मुकेशभाई पटेल, सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंग, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप नाविक तसेच सिने अभिनेता अक्षय आनंद यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक आणि विविध मान्यवरांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली.


फेस्टिवलमध्ये “वर्सोवा कोस्टल सी फूड” आणि “परंपरा वेसावकर” यांच्या कलाकारांनीही सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली. सांस्कृतिक सादरीकरणे, खाद्यपदार्थांची विविधता आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे दांडी सी फूड फेस्टिवल 2026 हा नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *