रामवाडीतील चुकीने प्रभाग क्र. 10 मध्ये गेलेली नावे अखेर दुरुस्त
पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध; प्रकाश वाघमारे, सागर साठे व विकास उडाणशिवे यांच्या हरकतीची महापालिका आयुक्तांकडून दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 5 मधील रामवाडी झोपडपट्टी परिसरातील सुमारे 900 ते 1000 मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने प्रभाग क्र. 10 च्या मतदार यादीत समाविष्ट झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी रामवाडी भागातील नागरिकांच्या वतीने प्रकाश वाघमारे, सागर साठे व विकास उडाणशिवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवली होती.
दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मूळ प्रारूप मतदार यादीत यादी भाग क्र. 122 मधील अनुक्रमांक 13757 ते 14756 पर्यंतचे सर्व मतदार प्रभाग क्र. 5 मध्ये योग्यरीत्या नोंदवण्यात आले होते. मात्र, दि. 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत याच यादी भागातील सर्व मतदारांची नावे चुकून प्रभाग क्र. 10 मध्ये छापण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रामवाडी परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
हा प्रकार महापालिका आयुक्त तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याची दखल घेतली. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या दि. 2 जानेवारी 2002 च्या आदेशानुसार, नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अशा प्रकारच्या मतदार यादीतील चुका दुरुस्त करता येतात. त्यानुसार संबंधित मतदार यादीची सखोल तपासणी करण्यात आली.
तपासणीअंती असे आढळून आले की, यादी भाग क्र. 122 हा प्रभाग क्र. 5 व प्रभाग क्र. 10 यांच्या सिमेलगत असला तरी, रामवाडी व सर्जेपुरा परिसरातील हे सर्व मतदार प्रभाग क्र. 5 मध्येच समाविष्ट होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रभाग क्र. 10 मध्ये चुकीने समाविष्ट करण्यात आलेले सर्व मतदार पुन्हा प्रभाग क्र. 5 मध्ये वर्ग करण्यात आले आहेत.
या बदलांची अधिकृत नोंद घेऊन महापालिकेच्या वतीने पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, ही यादी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित राहिला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
