• Tue. Oct 14th, 2025

भिंगार छावणी परिषदेत स्वच्छता ही सेवा अभियानाचा समारोप

ByMirror

Oct 3, 2025

महात्मा गांधी-माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी


स्वच्छता ही सेवा केवळ मोहिम नसून, प्रत्येकाची जबाबदारी -विक्रांत मोरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे स्वच्छता ही सेवा या अभियानाचा समारोप करण्यात आला.
दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत छावणी क्षेत्र स्वच्छ सुंदर करण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी छावणी परिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या सहकार्याने आम्ही वचनबद्ध राहू असे मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांनी सांगितले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ इतिहास अभ्यासक भुषण देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, मनोनित सदस्य वसंत राठोड, स्वच्छता निरीक्षक रमेश साके, सुनिल शिंदे, गणेश भोर, स्नेहा पारनाईक, डॉ. गीतांजली पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी या प्रसंगी स्वच्छता अभियान गीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.


मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी म्हणाले की, स्वच्छता ही सेवा केवळ एक मोहिम नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. महात्मा गांधींच्या विचारांचे अनुसरण करत, आपण समाजातील प्रत्येक भागात स्वच्छता पसरवली पाहिजे. आज विद्यार्थी, कर्मचारी आणि नागरिकांनी दिलेल्या योगदानामुळे ही मोहीम यशस्वी झाली आहे. त्यांचा प्रयत्न आदर्श म्हणून इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी छावणी परिषद सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि यापुढेही समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी करून मोहीम आणखी प्रभावी करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.


भूषण देशमुख यांनी स्वच्छता कर्मचारी यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे. स्वच्छ, निरोगी आणि सुंदर भारताच्या निर्मितीत ते महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमातून स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संजय शिंदे, ठेकेदार राजेश काळे, विभागीय अभियंता अशोक फुलसौंदर, भांडारपाल योगेश बोरुडे, संगणक अभियंता धनश्री शहा, वरिष्ठ राजस्व लिपिक शिशिर पाटसकर तसेच छावणी परिषदेतील शाळेतील कर्मचारी, परिवहन, पीडब्ल्यूडी, सर्व सफाई कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *