तातडीने बांधकाम थांबवून अतिक्रमण हटविण्याची बहुजन समाज पार्टी व दर्गाच्या विश्वस्तांची मागणी
दुकानदार दोन समाजात जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बेलदार गल्ली, दाळमंडई येथील दर्गाला जाणारा रस्ता बंद करुन, देवस्थानची भिंत तोडून त्यावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदाराला बांधकामाची परवानगी न देता, सुरु असलेले बेकायदेशीर बांधकाम थांबविण्याची तक्रार बहुजन समाज पार्टी व दर्गाच्या विश्वस्तांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.

सदर दुकानदार दर्गाचा रस्ता बंद करुन दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, दर्गाच्या विश्वस्तांना देखील दमदाटी करुन शहराचे वातावरण दूषित करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी बसपाचे जिल्हा प्रभारी सुनिल ओहोळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, फिरोज (पत्रेवाला) शेख, दर्गाचे विश्वस्त तस्लिम शेख, खालिद शेख, योगेश खेडके आदी उपस्थित होते.
बेलदार गल्ली, दाळमंडई येथे सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या पीर कालाशाह लोहारशाह यांची दर्गा आहे. या दर्गाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. मात्र दर्गा शेजारील एका दुकानदार व त्याच्या मुलाने दर्गाकडे जाणारा रस्ता जाणीवपूर्वक बंद केल्याने येणाऱ्या भाविकांना अडचण निर्माण झाली आहे. तसेच या दुकानदाराने देवस्थानची संरक्षक भिंत तोडून त्यावर अतिक्रमण केले आहे. तर राजकीय लोकांना सोबत घेऊन त्याचा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या प्रकारामुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होत असून, दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे. तसेच तो दुकानदार दर्गाचे विश्वस्त व चेअरमन यांना दमदाटी करून बाहेरचे गुंड आणून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
त्या दुकानदाराने बांधका सुरु केले असून, त्याला बांधकामाची परवानगी देऊ नये व बेकायदेशीर बांधकाम थांबवून मोजणी रद्द करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.