काही वर्षापासून रखडलेल्या केडगावकरांसाठी अखेर तो रस्ता होणार
केडगावकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील -सचिन (आबा) कोतकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- काही वर्षापासून रखडलेल्या व नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या केडगाव येथील प्रभाग 16 मधील शाहूनगर परिसरातील रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे प्रारंभ करण्यात आले. माजी नगरसेवक सुनिल (मामा) कोतकर व संदीपदादा कोतकर युवा मंचच्या पाठपुराव्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे.
रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक सुनील (मामा) कोतकर, उद्योजक जालिंदर कोतकर, नगरसेवक मनोज कोतकर, सविता कराळे, अशोक कराळे, जयदत्त खाकाळ, पोपट कराळे, भूषण गुंड, निलेश सातपुते, रामदास काकडे, सुरज शेळके, महेश दळवी, अनिल भोर, भाऊ तापकीरे, रामदास सातपुते, धीरज पाटील, राहुल जगताप, रोनित कोतकर, शुभम कोतकर, पंकज शिंदे, सोनू हजारे आदींसह परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सचिन (आबा) कोतकर म्हणाले की, मागील काही वर्षापासून केडगावकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेक विकासकामे प्रलंबीत राहिली. मात्र स्थानिक नगरसेवक व संदीपदादा कोतकर युवा मंच वतीने खासदार डॉ. विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन निधी प्राप्त करुन विकासकामे मार्गी लावण्यात आली आहे. केडगावकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, यापुढे प्रलंबीत विकासकामे तातडीने पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुनील (मामा) कोतकर म्हणाले की, प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी खासदार विखे पाटील यांच्याकडून दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विकास कामांमध्ये आलेली मरगळ बाजूला करून प्रलंबीत प्रश्न सोडविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याचे काम प्रलंबीत असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मात्र हा प्रश्न सोडविण्यात आला असून, माजी महापौर संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.