• Sat. Nov 22nd, 2025

झाशीची राणी जयंतीनिमित्त तारकपूरमध्ये शालेय परिसरात स्वच्छता मोहीम

ByMirror

Nov 20, 2025

स्वच्छता दूतांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग

आरोग्याच्या दृष्टीकोनाने स्वच्छता हीच खरी देशभक्ती -सुनील सकट

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- झाशीची वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त तारकपूर येथील सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण जपण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाद्वारे सार्वजनिक स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले.
या अभियानात स्वच्छता दूत मनोहर खूपचंदानी, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते सुनील सकट, अविनाश रनदिवे यांनीही या मोहिमेत सक्रीय सहभागी झाले होते. शाळेच्या मैदान परिसरात साचलेला कागदी कचरा, प्लास्टिक पिशव्या, सुकलेली पाने व सामान्य कचऱ्याचा ढिग साफ करण्यात आले. हातात झाडू घेत सर्वांनी एकत्रितपणे मैदानाची स्वच्छता केली. जमा केलेला सर्व कचरा नगरपालिकेच्या घंटागाडीत टाकून परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला.


विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शालेय परिसर स्वच्छ ठेवणे आवश्‍यक असल्याने नागरिकांनीही यात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. स्वच्छतेनंतर कार्यकर्त्यांनी सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिकांची भेट घेऊन मैदान परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.


मनोहर खूपचंदानी हे अनेक वर्षांपासून शहर व परिसरात स्वच्छता मोहिमा, पर्यावरण संवर्धन अभियान आणि जनजागृती उपक्रम राबवित असून त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन सामाजिक कार्यकर्ते सुनील सकट यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन समाजात स्वच्छतेचा संदेश पोहोचविला.
मनोहर खूपचंदानी म्हणाले की, स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नाही; ती आपण सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छतेचा हा उपक्रम राबविण्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थी व पालकांमध्ये स्वच्छतेच्या सवयींचा संदेश पोहचविण्यासाठी सदर अभियान राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सुनील सकट म्हणाले की, स्वच्छता हीच खरी देशभक्ती आहे. आपण स्वच्छ परिसर, स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला तर शहराचे भविष्य उज्ज्वल होईल. अशा मोहिमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो. नागरिकांनीही शाळा व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. शालेय परिसर हा मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे नागरिकांनीही कचरा सर्रास टाकण्याची चुकीची सवय टाळावी. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवल्यासच शहर सुंदर बनेल आणि आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *