• Tue. Feb 17th, 2026

भिंगारच्या तपेश्‍वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बेलवृक्ष लागवड करुन स्वच्छता अभियान

ByMirror

Feb 16, 2026

‘बम बम भोले’च्या जयघोषात पर्यावरण संवर्धनाचा संदेश; हर दिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम


भाविकांना खिचडी व फळांचे वाटप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील तपेश्‍वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने ‘बम बम भोले’च्या गजरात मंदिरासमोरील परिसरात बेलाच्या झाडाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यानंतर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मंदिर परिसरात स्वच्छता करून प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला. “स्वच्छ मंदिर, स्वच्छ परिसर आणि हरित वातावरण” या संकल्पनेवर भर देत उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचे आवाहन करण्यात आले.


महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवलिंगाची विधीवत पूजा करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. बेलवृक्ष हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानले जाते. त्यामुळे धार्मिक परंपरेला पर्यावरणाची जोड देत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी व फळांचे वाटप करण्यात आले. या अभियानात तपेश्‍वर महादेव मंदिराचे सर्व पदाधिकारी तसेच हरी ओम भजनी मंडळ (भिंगार) येथील महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


कार्यक्रमास ह.भ.प. माया गोरखे, प्रांजली सपकाळ, सुनिताताई वराडे, संगीता सपकाळ, उषाताई ठोकळ, मीना ससाणे, ह.भ.प. रेखाताई मडावी, संगीता दरवडे, गीतांजली धाडगे, सरिता शिंदे, सुरेखा कारडामे, हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, जहीर सय्यद, सुंदर पाटील, दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, सचिन चोपडा, विलास आहेर, राजेंद्र चंगेडिया, ह.भ.प गोकुळ धाडगे, रतनशेठ मेहेत्रे, अभिजीत सपकाळ, दीपक धाडगे, मनोहर दरवडे, दिलीप गुगळे, ईवान सपकाळ, अशोक दळवी, अशोक पराते, अविनाश जाधव, मच्छिंद्र बेरड, डॉ. अतुल मडावी, सुभाष होडगे, नंदू नायकू, मुन्ना वाघस्कर, राजू कांबळे, रामनाथ गर्जे, शशिकांत पवार, विशाल भामरे, योगेश चौधरी आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हर दिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की, महाशिवरात्री हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो आत्मशुद्धी आणि समाजसेवेचा संदेश देणारा दिवस आहे. भगवान शिवाला प्रिय असलेला बेलवृक्ष लावून आम्ही पर्यावरण संवर्धनाची छोटी पण महत्त्वाची सुरुवात केली आहे. आजच्या काळात प्रदूषण, प्लास्टिकचा वाढता वापर आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही गंभीर समस्या बनली आहे. प्रत्येकाने वर्षातून किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन केले तर भविष्यातील पिढ्यांसाठी आपण हिरवेगार भविष्य घडवू शकतो. मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. धर्म आणि पर्यावरण यांची सांगड घालत समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.


गोकुळ धाडगे म्हणाले की, “भगवान शिव हे निसर्गाचे अधिष्ठाता देव आहेत. त्यांच्या पूजेत बेलपत्राचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बेलवृक्ष लागवड हा केवळ धार्मिक विधी नसून पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा आहे. स्वच्छता हीच खरी सेवा आहे. मंदिर परिसर स्वच्छ असेल तर भाविकांना समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. अशा उपक्रमांमधून सामाजिक जाणीव निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *