अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री रामावतार मानधना चारिटेबल ट्रस्ट संचलित महावीर मल्लखांब ॲण्ड योगा ट्रेनिंग सेंटरच्या शालेय विद्यार्थ्यांनी 5001 सूर्यनमस्कार करून जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला. रथसप्तमीनिमित्त आरोग्याचा जागर करुन हा सोहळा रंगला होता.

या कार्यक्रमासाठी न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर डॉ. शरदचंद्र मगर, अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव उमेश झोटिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी मगर व झोटिंग यांनी मुलांना सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगून दररोज सूर्यनमस्कार करण्याचे आवाहन केले.
महावीर मल्लखांब ॲण्ड योगा ट्रेनिंग सेंटरमध्ये शालेय विद्यार्थी गेल्या 14 वर्षापासून सातत्याने योगा आणि मल्लखांब या पारंपरिक खेळांचा सराव करतात. या सेंटरमधून अनेक राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे काम सेंटरचे प्रशिक्षक प्रणिता तरोटे, आप्पा लाढाणे, ऋतुजा वाल्हेकर, अक्षता गुंड पाटील सातत्याने करीत आहेत.