97 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते साहित्य पुरस्काराचे होणार वितरण
नगर (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यासाठी मराठी अस्मितेसाठी मराठी रयतेसाठी ब्रिटिशां विरुद्ध एकाकी झुंज देऊन करवीर संस्थांचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज अहमदनगर येथे हुतात्मा झाले. त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीने छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावे दरवर्षी राज्य साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी दिली.
हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार दरवर्षी 25 डिसेंबर रोजी प्रदान करण्यात येतात. पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. यावर्षीचे पुरस्कार निवड समितीने परीक्षण करून जाहीर केले आहेत. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने जिल्हाभर शिक्षण प्रसार करून ज्ञानगंगा प्रवाहित केली. संस्थेची विद्यालय व महाविद्यालय ग्रामीण भागात विद्याप्रसार करताना विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तू व गरजा भागविण्यासाठी संस्थेने सहकारी ग्राहक भांडाराची स्थापना केली. अशा या भांडाराची वाटचाल यशस्वीरित्या चालू आहे. या श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराच्या वतीने संस्थेचे प्रेरणास्थान असलेले हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात येतात. त्या पुरस्कारांचा प्रदान सोहळा बुधवारी 25 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9:00 वाजता राजर्षी शाहू महाराज सभागृह न्यू आर्ट्स कॉलेज मध्ये संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव तथा ग्राहक भांडाराचे सभापती ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांनी दिली. सदर कार्यक्रमास साहित्यिक, प्रकाशक, ग्रंथवितरक आणि साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या वर्षीचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार 2024 ठाणे येथील गितेश गजानन शिंदे यांच्या सीसीटीव्हीच्या गर्द छायेत (कविता संग्रह), जयसिंगपूर येथील डॉ. महावीर रायाप्पा अक्कोळे यांच्या संतांचा तो संग नव्हे भलतैसा (धार्मिक, संत साहित्य), पुणे येथील देवा गोपीनाथ झिंजाड यांच्या एक भाकर तीन चुली (कादंबरी) तसेच पुणे येथील दिपाली मुकुंद दातार यांच्या पैस प्रतिभेचा (वैचारिक), सांगली येथील महादेव तुकाराम माने यांच्या वसप (कथा संग्रह) या साहित्य कृतींना राज्य साहित्य पुरस्कार देण्यात येत आहेत. तसेच कोल्हापूर येथील प्राचार्य. डॉ. जोतीराम कृष्णराव पवार यांच्या राजर्षी शाहूंची वाडम:यीन स्मारके (संपादित, ऐतिहासिक ग्रंथ) या साहित्यकृतीला विशेष राज्य साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरावरील जिल्हा साहित्य पुरस्कार श्रीकांत नारायण लगड यांच्या उमंग (चरित्र) या ग्रंथास जाहीर केला आहे. संस्थेतील लेखक, साहित्यिक डॉ. रामदास टेकाळे यांचा साहित्य गौरव करण्यात येणार आहे. असे पुरस्कार निवड समितीच्या वतीने पुरस्कार निवड समितीचे कार्यकारी समन्वयक प्रा. गणेश भगत यांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्काराची घोषणा केली.
यावेळी अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, भांडाराचे सभापती व संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, चेअरमन दत्ता पाटील नारळे, व्हाईस चेअरमन विजय जाधव, श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडारचे सर्व पदाधिकारी व पुरस्कार निवड समिती सदस्य प्राचार्य डॉ.एम.एम. तांबे, डॉ. बापू चंदनशिवे, डॉ. वैशाली भालसिंग, डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, लेखक रंगनाथ भापकर, व्यवस्थापक भाऊसाहेब पवार, पुरस्कार समिती समन्वयक प्रा. गणेश भगत आदी उपस्थित होते.
