भयभीत झालेल्या महिलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव
घरातील वस्तूंचे नुकसान
अहमदनगर (प्रतिनिधी)- मध्यरात्री दारुच्या नशेत टोळक्याने येऊन घरावर दगडफेक करणाऱ्या आठ ते दहा जणांचा समावेश असलेल्या पुरुष व महिलांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याच्या मागणी तक्रारदार महिला शितल संतोष खटावकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
शितल खटावकर या तपोवन रोड, भिस्तबाग महाल येथील शिवम कॉलनीमध्ये राहत आहे. 9 जानेवारीच्या मध्यरात्री अचानकपणे काही पुरुष व महिलांनी येऊन शिवीगाळ करून घरावर दगड भिरकावले. या जीवघेण्या हल्ल्यात कुटुंबीय घाबरून गेले असून, यामध्ये घरातील वस्तूंचे देखील मोठे नुकसान झाले. अशा वेळेस पोलीस स्टेशनला फोन करून कळवले, परंतु कोणी घटनास्थळी आले नाही. या संदर्भात वेळोवेळी तक्रार देऊन ही पोलिसांनी कुठलीच तक्रार दाखल करुन घेतली नसल्याचा आरोप खटावकर यांनी केला आहे.
दुसऱ्या दिवशी पुण्याहून नगरला आलेले अभिजीत खटावकर तक्रार देण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशनला गेले असता, त्यांना दमदाटी करत तुझेही नाव केस मध्ये टाकून धमकाविण्यात आले. घरावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींपासून कुटुंबीयांना धोका निर्माण झाला असून, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करुन तातडीने कारवाई करण्याची मागणी शितल खटावकर यांनी केली आहे.
