खोट्या कागदपत्राद्वारे फसवणुक केल्याप्रकरणी सीएंविरोधात कोतवालीत गुन्हा दाखल
हॉलमार्किंग व्यावसायिकाला जीएसटी भरण्याच्या नावाखाली गंडा; 38 लाखांचे नुकसान
नगर (प्रतिनिधी)- गंज बाजार येथील सोने-चांदीच्या दागिण्यांना हॉलमार्किंगचे व्यवसाय करणारे राजेश बाळासाहेब भोसले (रा. सारसनगर) यांच्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीए सचिन आप्पासाहेब दुधाडे (रा.भिस्तबाग, तपोवन रोड), सीए देवेंद्र अण्णासाहेब पाटील (रा. यशोदानगर पाईपलाईन रोड) आणि सोनाली लोणकर या तिघांनी जीएसटी व इन्कम टॅक्स भरण्याच्या नावाखाली 18 लाख 31 हजार 299 रुपयांचा अपहार केला असून, बनावट व खोटे कागदपत्र तयार करून भोसले यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
राजेश भोसले व त्यांच्या भावाने मिळून 2021 पासून सूर्या हॉलमार्किंग या नावाने गंज बाजारात हॉलमार्किंग व्यवसाय सुरू केला. व्यवसायाच्या आर्थिक व कर संबंधित कामांसाठी त्यांनी सीए दुधाडे व पाटील यांची नियुक्ती केली होती. यासाठी त्यांनी वेळोवेळी चेक, आरटीजीएस व रोख स्वरूपात 18.31 लाख रुपये दिले.
दरम्यान, जीएसटी व इन्कम टॅक्स रिटर्न नियमितपणे भरल्याचा बनावट अहवाल त्यांनी सादर केला. मात्र डिसेंबर 2024 नंतर भोसले यांनी याबाबत चौकशी केली असता, खात्यात कोणतीही जीएसटी भरणा न झाल्याचे समोर आले. संबंधित सर्टिफिकेटही खोटे असल्याचे जीएसटी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
त्यामुळे हॉलमार्किंग फर्मवर आता 38 लाख रुपयांच्या दंडासह व्याजाची रक्कम भरावी लागणार आहे. या फसवणुकीत पुण्याची अर्णव एंटरप्राइजेस फर्म व त्यातील भागीदार सोनाली लोणकर हिचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भोसले यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 अंतर्गत कलम 316 (2), 318 (4), व 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.