• Mon. Jul 21st, 2025

राष्ट्रवादी युवक व युवतीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण

ByMirror

Jan 4, 2024

प्रभू श्रीरामबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

आव्हाड यांचे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे -इंजि. केतन क्षीरसागर

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी युवतीच्या (अजित पवार गट) वतीने प्रतिकात्मक पुतळ्याचे शहरात दहण करण्यात आले. तर जोरदार निदर्शने करुन आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत समाजात फुट पाडण्यासाठी बेताल वक्तव्य जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.


आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सावेडी येथील प्रोफेसर चौकात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस काळे फासून निषेध नोंदविण्यात आला. तर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करुन सर्जेपूरा चौकात आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले. प्रभू रामाबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करुन त्याला अटक करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, प्रवक्ते किरण घुले, मंगेश शिंदे, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर, राष्ट्रवादी युवतीच्या ॲड. अंजली आव्हाड, कृष्णा शेळके, शिवम कराळे, ऋषिकेश जगताप, गौरव हरबा, सुरज शिंदे, रोहित सरना, तन्वीर मणियार, अरबाज शेख, सागर विधाते, भारत जाधव, ओंकार साळवे, केतन ढवण, ओंकार मिसाळ, कुणाल ससाणे, मंगेश जोशी, वैभव ससे, हरीश पंडागळे, सुमित गोहेर, दीपक गोरे, ओंकार म्हसे, भारत जाधव, ओम भिंगारदिवे, आकाश ससाणे, पियूष ठोंबरे, अभिजीत साठे, नितीन राजगुरु, अश्‍विनी शिंदे, सुनिता गुगळे, माधवी गलपेल्ली, आफरीन सय्यद, गौरी बोरुडे, योगिता कुडिया, कोमल मोहिते, रोहन ठोंबरे, प्रेम नवगीरे, स्वप्निल नवगीरे, अभिजीत वैरागर आदींसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, आव्हाड यांचे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे आहे. प्रभू श्रीराम कोणत्या ठराविक समाजाचे नसून, ते समस्त हिंदुस्तानचे आहे. देवतांना राजकारणासाठी वाटून घेऊ नये, महायुतीचे सरकार महाराष्ट्रात एकोपा निर्माण करुन कल्याणकारी सरकार चालवत आहे. मात्र समाजाचे वातावरण दूषित करण्यासाठी आव्हाड वारंवार बेताल वक्तव्य करत आहे. प्रभू श्रीरामांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याने समस्त हिंदूच्या भावना दुखावण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रवक्ते किरण घुले म्हणाले की, राजकारणासाठी देवाची वाटणी करणे हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात असमानता पसरविण्याच्या उद्देशाने आव्हाड यांनी जाणीवपूर्वक वक्तव्य केले आहे. त्यांना हिंदू बांधव धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *