शाहू, फुले, आंबेडकरी विचार झुगारुन जातीयवादी पक्षांचा संविधानाला आघात -डॉ. हुलगेश चलवादी
नगर (प्रतिनिधी)- शाहू, फुले, आंबेडकरी विचार झुगारुन जातीयवादी पक्ष संविधानाला आघात पोहचवित आहे. जातीयवादी शक्ती व पक्षांना शह देण्यासाठी बहुजन समाज पार्टी सर्व समाजाला बरोबर घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे. सत्तेसाठी विचारांशी तडजोड करणाऱ्यांबरोबर न जाता स्वबळावर सर्व निवडणुका लढविल्या जाणार असल्याची पक्षाची भूमिका प्रदेश महासचिव डॉ. हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केली.
बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी चलवादी बोलत होते. या बैठकीसाठी प्रदेश सचिव रामचंद्र जाधव, पुणे झोन बामसेफ संयोजक रामटेके, अनिल त्रिपाठी, जिल्हा अध्यक्ष सुभाष कांबळे, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी सुनील ओव्हळ, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, राजू शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष अंजुम शेख, प्रकाश अहिरे, फिरोज शेख आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेण्यात आले. तर त्यांना निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी विविध सूचना करण्यात आल्या. तसेच महिला जिल्हाध्यक्षपदी अंजुम सय्यद आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सुनील ओव्हाळ यांनी गाव पातळीवर सुरु असलेल्या पक्षाच्या कार्याचा आढावा घेऊन सर्व पदाधिकारी या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवून देणार असल्याचे सांगितले. उमाशंकर यादव यांनी गाव तेथे शाखा कार्यान्वीत झाली असून, पक्षाची बांधणी सुरू आहे. सर्व कार्यकर्ते पक्षाच्या ध्येय-धोरणाप्रमाणे कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.
