महापुरुषांच्या विचारांना अंगीकारण्याचे आवाहन
महापुरुषांच्या क्रांतिकारक विचारांनी महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींना बळ दिले -मारुती पवार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने साजरी करण्यात आली. पंडित नेहरू आणि लहुजी वस्ताद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
देशाच्या विकासात आणि सामाजिक परिवर्तनात योगदान देणाऱ्या या महापुरुषांच्या कार्याची आठवण उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. कार्यक्रमास माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष मारुती पवार, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विजय गव्हाळे, जितू गंभीर, महिला जिल्हाध्यक्षा आशाताई निंबाळकर, मयूर भापकर, भरत गारूडकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, महादू शिपणकर, सुशिल शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मारुती पवार म्हणाले की, पंडित नेहरू यांनी आधुनिक भारताचा पाया रचला. वैज्ञानिक दृष्टिकोन, औद्योगिक क्रांती आणि लोकशाही मूल्यांची बीजे त्यांनी पेरली. आजचा तरुण वर्ग प्रगतीच्या दिशेने पुढे जात असताना नेहरूंच्या दूरदृष्टीचा प्रचिती सर्वांना येत आहे. तर लहुजी वस्ताद साळवे हे दुर्बल, पीडित आणि वंचित घटकांसाठी संघर्ष करणारे प्रेरणादायी समाजसुधारक होते. त्यांच्या क्रांतिकारक विचारांनी महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींना बळ दिले असल्याचे त्यांने सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, आजच्या पिढीने नेहरूंच्या संविधाननिष्ठ लोकशाही मूल्यांपासून प्रेरणा घ्यावी. त्यांनी घडवलेल्या संस्थांमुळेच भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून टिकून आहे. लहुजी वस्ताद साळवे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
