सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना राज्यस्तरीय आयडॉल भूमीपुत्र पुरस्कार तर पै. नाना डोंगरे यांना क्रीडा भूषण पुरस्काराने शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. नेवासा फाटा येथील त्रीमुर्ती पावन प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अनाथ आश्रम चालवणाऱ्या समाजसेविका ह.भ.प. संगीताताई गुंजाळ व त्रीमूर्ती शैक्षणिक संकुलचे अध्यक्षा ॲड. सुमती धाडगे पाटील यांच्या हस्ते भालसिंग व डोंगरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सैनिक समाज पार्टीचे राज्य कार्याध्यक्ष तुकाराम डफळ, काव्य संमेलनाचे अध्यक्ष रज्जाक शेख, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, सचिव ताईसाहेब वाघमारे, उपाध्यक्ष सुरेश शिरसाठ, कवी देविदास बुधवंत, आनंदा साळवे, बापूसाहेब काळे आदी उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. मुळगाव वाळकी (ता. नगर) असलेले भालसिंग एसटी बँकेत कार्यरत असून कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सेवा करत आहे. गरजू-निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मंदिराचे जीर्णोध्दार, सार्वजनिक परिसर व बारवची स्वच्छता, वारकरी संप्रदायाचे संघटन, वृक्ष रोपण आदी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. गाव पातळीवर विकासात्मक कार्याला चालना देऊन त्यांचे समाजकार्य सुरु आहे.
तर निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात डोंगरे यांनी क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम केले आहे. विविध स्पर्धा घेऊन नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे ते सातत्याने कार्य करत आहे. कुस्ती खेळातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू घडले आहे. या कार्याची दखल घेऊन भालसिंग व डोंगरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.