अहमदनगर (प्रतिनिधी)- भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाचे मुख्याध्यापक हबीब चाँद शेख यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल नाशिक येथील भावना आणि युनिटी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नाशिक येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बावा यांच्या हस्ते शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी विनोद अंबरकर, अलकाताई गायकवाड, नाशिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी शिरसाठ, संस्थेचे अध्यक्ष राहुल मोरे, सचिव महेश मुळे, वाजिद खान आदी उपस्थित होते.
हबीब शेख हे उपक्रमशील मुख्याध्यापक असून, मागील 28 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात योगदान देत आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाने त्यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थी घडविले आहेत. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात त्यांचे निस्वार्थपणे कार्य सुरू आहे. सामाजिक उपक्रमात ते नेहमीच अग्रेसर असतात. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असून, पर्यावरण क्षेत्रात देखील योगदान देत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय जीवनगौरव कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल शेख यांचे भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे (केडगाव) संस्थापक अध्यक्ष भानुदास कोतकर, माजी महापौर संदीप कोतकर, संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे यांनी अभिनंदन केले आहे.