लोकसभेला निवडून येण्यापूर्वी नागरिकांना दिलेला शब्द पाळला -डॉ. सुजय विखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रामवाडी, कोठला झोपडपट्टीची जागा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ताब्यातून राज्य सरकारकडे वर्ग करण्यास यश आले आहे. लवकरच ही जमीन राज्य सरकारकडे वर्ग झाल्यानंतर ती जागा महापालिकेकडे वर्ग करुन स्थानिक नागरिकांना हक्काची घरे बांधता येणार आहे. लोकसभेला निवडून येण्यापूर्वी येथील नागरिकांना दिलेला शब्द पाळण्यात आले असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
राज्य सरकारकडून आलेल्या दोन कोटीच्या निधी मधून शहराच्या प्रभाग क्रमांक 10 मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन खासदार विखे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंगल गेट शिवसेनेचे जिल्हा जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी विकास कामाचा उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी नगरसेविका अश्विनी जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, भाऊ उनवणे, माजी नगरसेवक निखील वारे, अब्दुल खोकर, माजी उपमहापौर हाजी नजीर शेख आदींसह विविध सामाजिक संघटनांचे व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना खासदार विखे म्हणाले की, नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या प्रयत्नाने व सचिन जाधव यांच्या पाठपुराव्याने प्रभागातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. जाधव यांचे प्रभागात भरीव योगदान असून, त्यांनी लोकांच्या मनात घर केले आहे. त्यांच्याशी वैचारिक ऋणानुबंध जोडले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन जाधव म्हणाले की, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी युवकांचे नेतृत्व करुन दक्षिण मतदारसंघात विकासाला चालना दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाने सर्वसामान्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. अनेक विकासात्मक प्रकल्प मार्गी लावून शहरातील उड्डाणपुलाचा जिव्हाळ्याचा प्रश्न देखील त्यांनी सोडवला. राजकारण करताना त्यांनी नेहमीच विकासाला साथ दिली. तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी माणसे जोडण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात खासदार विखे यांच्या हस्ते सचिन जाधव यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. उपस्थित विविध सामाजिक संघटनांचे व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.