• Fri. Apr 3rd, 2026

भाऊसाहेब कदम यांना पंडित जवाहरलाल नेहरू गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

ByMirror

Apr 2, 2026

दिव्यांगांच्या शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तुबा नाज हेल्प मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व मोलाचे योगदान दिल्याबद्दल भाऊसाहेब लक्ष्मण कदम यांना पंडित जवाहरलाल नेहरू गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.


अल्पबचत भवन, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात नंदूरबारचे उपजिल्हाधिकारी मनोज देशमुख यांच्या हस्ते कदम यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सतीश बावीस्कर, जळगाव सोसायटीचे संचालक विजय पवार, माजी मुख्याध्यापक शब्बीर शेख, एकता संघटनचे अध्यक्ष फारुक शेख, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोफ्लगरे, हकीम चौधरी, फारुक पटेल, संस्थेचे अध्यक्ष डॉ. जावेद शेख आदी उपस्थित होते.


भाऊसाहेब लक्ष्मण कदम हे टिळक रोड येथील ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटीच्या कार्यशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी केवळ शैक्षणिक मार्गदर्शनच केले नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून त्यांना स्वावलंबी जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले आहे.


कदम यांनी अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत स्वतःचे स्थान निर्माण केले असून, समाजात सन्मानाने उभे राहण्याची ताकद मिळवली आहे. शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य प्रशिक्षण आणि पुनर्वसन यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी देत असलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *