दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड
शाळेच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाने ऊर्जा व संरक्षण राष्ट्रीय अभियान 2023 अंतर्गत घेतलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या इयत्ता 10 वी मधील विद्यार्थिनी जिज्ञासा सुरेश छिंदम हिने यश संपादन केले. या स्पर्धेत छिंदम हिने उत्तेजनार्थ बक्षीस पटकाविले असून, तिची एनटीपीसी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
मुंबई येथे नुकतीच राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा पार पडली. यामध्ये छिंदम हिला उत्तेजनार्थ बक्षिस म्हणून दहा हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्रक व कला साहित्य देण्यात आले. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त मंडळाच्या सदस्या सुनंदा भालेराव, विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक रावसाहेब बाबर, पर्यवेक्षक आशा सातपुते, बाळू वाव्हळ, पर्यवेक्षक विष्णु गिरी आदींनी तिचे कौतुक केले आहे.
विद्यालयाचे कला अध्यापक राजकुमार बनसोडे, प्रवीण साळुंखे, धर्मराज लोखंडे आदींचे तिला मार्गदर्शन लाभले. शाळेच्या वतीने तिचे अभिनंदन करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या.