लहुजी शक्ती सेनेचा पुढाकार
जिल्ह्यातून मोठ्या संख्येने जनसमुदाय अधिवेशनात सहभागी होणार -किरणभाऊ उमाप
नगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने 1 मार्च रोजी पुणे येथील दशभूजा मैदानावर राज्यस्तरीय मातंग समाजाचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांना सहभागी करुन घेण्यासाठी जिल्हा महासचिव किरणभाऊ उमाप यांच्या नेतृत्वाखाली तालुका स्तरावर दौरे सुरू करण्यात आले आहेत.
महा अधिवेशनाच्या तयारीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (दि.20 फेब्रुवारी) पासून तालुका दौरे सुरु होणार असून, संघटनेचे पदाधिकारी तालुकास्तरावर बैठकीचे नियोजन करुन समाजबांधवांशी संवाद साधणार आहे. तर सदर महा अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जाणार असल्याची माहिती मोहन साळवे यांनी दिली.
20 फेब्रुवारी रोजी नेवासा, शेवगाव, पाथर्डी तालुक्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी पारनेर, 22 फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात, 23 फेब्रुवारी रोजी राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर तालुक्यात आणि 24 फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर शहर व तालुक्यात बैठक होणार आहे.
जिल्ह्यातून मोठ्या संख्येने जनसमुदाय अधिवेशनात सहभागी होणार असल्याचा निर्धार किरणभाऊ उमाप यांनी व्यक्त केला आहे. तर या सर्व बैठकींना तालुक्यातील पदाधिकारी व समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.