ब्युटिशियन महिलांना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- ब्युटिशियन क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना चालना देण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा सप्ताहानिमित्त शनिवारी (दि.13 जानेवारी) जिल्हास्तरीय ब्युटी टॅलेंट शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, जय युवा अकॅडमी व अहिल्या फाऊंडेशनच्या वतीने होणाऱ्या या स्पर्धेत ब्युटिशियन महिलांना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा ब्युटिशियन कावेरी कैदके यांनी केले आहे.
शनिवारी सावेडी, गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात दुपारी 3 वाजता ही स्पर्धा रंगणार आहे. दिवसेंदिवस अत्याधुनिक पद्धतीचे शास्त्रोक्त पद्धतीने मेकअप करण्याची कला बाजारात प्रचलित होत आहे. सौंदर्याबाबत महिला देखील जागृक झाल्या असून, सौंदर्य खुलविण्यासाठी विविध प्रकारे काळजी घेत आहे. बाजारात नव्याने आलेले सौंदर्य प्रसाधने, त्वचेला हानी न पोहोचविता करता येणारी उपाययोजना व सुंदरता वाढविणारे विविध तंत्रज्ञानाची माहिती देखील या स्पर्धेतून ब्युटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना मिळणार आहे. ब्युटी क्षेत्रात चांगले करिअर करण्याची व महिलांना स्वयंरोजगारीची संधी निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने ब्युटी टॅलेंट शोचे आयोजन करण्यात आले असल्याचे कैदके यांनी सांगितले.
ब्युटी टॅलेंट शो मध्ये सहभागी होण्यासाठी युवती व महिलांनी 9921712312,9834298309 व 9657511869 या नंबरवर संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी सर्व महिलांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उडान फाउंडेशनच्या संचालिका आरती शिंदे, प्रगती फाउंडेशनच्या अश्विनी वाघ, जय युवाच्या जयश्री शिंदे, समृद्धी संस्थेच्या स्वाती डोमकावळे प्रयत्नशील आहेत.