महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कौशल्य प्रशिक्षणातून युवतींना आपला व्यवसाय उभा करता येणार -कविता तडके
नगर (प्रतिनिधी)- जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शहरातील महिलांसाठी सरकारमान्य ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालय संचलित जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डावरे गल्ली येथे के.टी. ब्युटी पार्लर ॲण्ड अकॅडमीच्या वतीने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षण शिबिराला महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जन शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार यांच्या हस्ते या ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, प्रशिक्षिका कविता तडके आदींसह प्रशिक्षणार्थी महिला व युवती उपस्थित होत्या.
बाळासाहेब पवार म्हणाले की, विविध कौशल्य आत्मसात करुन महिलांनी समाजात उभे रहावे. कौशल्य प्रशिक्षण व्यवसाय उभारणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अनेक महिला व युवतींनी जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन स्वत:चा विकास साधला आहे. भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. युवक-युवतींमध्ये कौशल्य विकसीत झाल्यास देशाच्या विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर जन शिक्षण संस्थेत 58 वर्षापासून प्रशिक्षणाची योजना सुरू झालेली असून, भारतभर 289 जन शिक्षण संस्था काम करत आहेत. मागील वर्षांमध्ये 5 लाख युवक-युवतींना वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. व्यवसाय उभारण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग केंद्र व प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत या प्रशिक्षणार्थींना कर्ज उपलब्ध करुन दिले जात असल्याची माहिती पवार यांनी दिली.
कविता तडके म्हणाल्या की, समाजात सक्षमपणे उभे राहण्यासाठी युवतींनी देखील उद्योग-व्यवसायात उतरण्याची गरज आहे. कौशल्य प्रशिक्षण घेऊन युवतींना आपला व्यवसाय उभा करता येणार आहे. युवतींसाठी ब्युटी पार्लर क्षेत्रात मोठी संधी असून, व्यावसायिक प्रशिक्षणातून महिला सक्षमीकरणाचा पाया रोवला जात आहे. महिला सक्षमीकरणाच्या या चळवळीत योगदान देताना अभिमान वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शफाकत सय्यद यांनी महिला आर्थिक सक्षम झाल्यास ते कुटुंबासह आपली प्रगती झपाट्याने साधू शकतात. महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून, उद्योग, व्यवसायात देखील महिला पुढे येत असल्याचे सांगून महिलांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षणात प्रत्येकी 20 महिलांचे बॅच करण्यात आलेल्या आहेत. तीन महिने यामध्ये महिला व युवतींना ब्युटी पार्लर ॲण्ड हेअर कटचे अद्यावत प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला-युवतींना या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.