• Wed. Oct 15th, 2025

फिनिक्स फाऊंडेशनची वारकऱ्यांमध्ये नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती

ByMirror

Jul 6, 2024

मरणोत्तर नेत्रदानातून, मरावे परी, दृष्टी रूपी उरावे! -भास्करगिरी महाराज

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- दृष्टी चांगली असेल तर सृष्टी दिसते. दृष्टीहीन मनुष्याला जीवन जगणे अवघड असून, देवाने निर्माण केलेले सौंदर्य ते पाहू शकत नाही. मात्र एखाद्याच्या नेत्रदानाने त्यांच्या जीवनात पुन्हा प्रकाश निर्माण होऊ शकतो. यासाठी नेत्रदानाची गरज आहे. मरावे परी, दृष्टी रूपी उरावे! याप्रमाणे मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.


आषाढीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती होण्यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने वाटप करण्यात येणारे पुस्तक आणि माहिती पत्रकाचा शुभारंभ भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी नेत्रदान व अवयवदानाची समाजाला असलेली गरज स्पष्ट करुन, वारकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहिम राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.


पुढे भास्करगिरी महाराज म्हणाले की, दृष्टी गेल्याने जग संपल्यासारखे वाटते. इतरांचे जीवन फुलविणारे मरणोत्तर नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान ठरत आहे. ज्याला दृष्टी अथवा एखादा अवयव नाही, त्याला त्या गोष्टीचे महत्त्व समजते. ते अवयव मिळाल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून निस्वार्थपणे नेत्रदान व अवयवदान चळवळीत योगदान सुरु असून, जात, धर्म, पंथ या भेदापलीकडे जाऊन मानवतेचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *