राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त निमगाव वाघा येथे होणाऱ्या चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने नाट्य अभिनेत्री तथा लेखिका गौरी रत्नपारखी यांच्या नसतोस घरी तू जेव्हा! या पुस्तकाला पु.ल.देशपांडे विनोदी साहित्य पुरस्कार व पोलीस उपनिरीक्षक वालचंदनगर पोलीस स्टेशनचे (पुणे ग्रामीण) रतिलाल चौधर यांना उत्कृष्ट पोलीस अधिकारी पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे.
स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती व राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त 12 जानेवारी रोजी निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात रत्नपारखी व चौधर यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी दिली.
नाट्य अभिनेत्री गौरी रत्नपारखी यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये मुख्य भूमिकेत काम केले आहे. मराठी/हिंदी सीरिअल्स, चित्रपट व वेब सिरीज मध्ये देखील त्या काम करत आहेत. बाबू बँड बाजा तीन नॅशनल अवॉर्ड पुरस्कार प्राप्त चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या नसतोस घरी तू जेव्हा! या पुस्तकाला पु.ल.देशपांडे विनोदी साहित्य पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे.
तसेच राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर हे पुणे जिल्हा तंटामुक्त समन्वयक आहेत. त्यांना राज्यस्तरीय महात्मा फुले पुरस्कार देखील मिळाला आहे. ते सचोटी, कर्तव्यपरायण व प्रामाणिक पोलिस अधिकारी आहेत. पोलीस दलात त्यांनी स्वत:ला झोकून देऊन कार्य केलेले आहे. तंटामुक्ती अभियानांतर्गत अनेक तंटे मिटविले असून, ग्रामसुरक्षा पथकातून समाजप्रबोधनाचे, संरक्षणाचे काम तरूणांच्या मदतीने केलेले आहे. गुन्हेगार प्रवृत्ती मूळापासून नष्ट करण्यासाठी व गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून परावृत्त करुन त्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम ते सातत्याने करत आहे. त्यांच्या पोलीस दलातील कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट पोलीस अधिकारी पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संयोजन कमिटीच्या वतीने सदर पुरस्कार्थींची नियुक्ती करण्यात आली असून, पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
