इंप्रिंट्स ऑफ नेचर ॲण्ड माय सोल काव्य संग्रहाला सरोजनी नायडू उत्कृष्ट काव्य पुरस्कार जाहीर
मराठी काव्य संग्रहाबरोबरच इंग्रजी काव्यसंग्रह लिहिणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या कवयित्री
नगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री सरोज आल्हाट यांच्या इंप्रिंट्स ऑफ नेचर ॲण्ड माय सोल या इंग्रजी काव्यसंग्रहास धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कवयित्री सरोजनी नायडू उत्कृष्ट काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर 12 जानेवारी रोजी होणाऱ्या सातव्या काव्य संमेलनात आल्हाट यांना सदर पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे व सचिव मंदा डोंगरे यांनी दिली.
या कार्यक्रमास स्वागताध्यक्ष खासदार निलेश लंके, साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, कवी गिताराम नरवडे, गझलकार रज्जाक शेख, माजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, कवी आनंदा साळवे आदी उपस्थित राहणार आहेत.

सरोज आल्हाट या मराठी काव्य संग्रहाबरोबरच इंग्रजी काव्यसंग्रह लिहिणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या कवयित्री आहेत.त्या गेल्या 30 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक,साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, अनेक महत्त्वाची पदे सांभाळतानाच, असंख्य इंग्रजी व मराठी मासिकांचे संपादन तसेच त्यांचे लिखाणही प्रसिद्ध झाले आहे. त्यांना अनेक प्रतिष्ठित राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या चार मराठी काव्यसंग्रहांप्रमाणेच इंग्रजी काव्यसंग्रहातील कविता ही तुल्यबळ, अत्यंत दर्जेदार आहे. या काव्य संग्रहाची दखल घेऊन आल्हाट यांच्या इंप्रिंट्स ऑफ नेचर ॲण्ड माय सोल या इंग्रजी काव्यसंग्रहास कवयित्री सरोजनी नायडू उत्कृष्ट काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.