3 टक्क्यांची ऑफर धुडकावून, जीवन जगण्यासाठी व मुला-बाळांच्या शिक्षणासाठी योग्य पगारवाढ देण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियन व ट्रस्टच्या नवीन करारसंदर्भात चार ते पाच वेळा सुनावणी होऊन देखील पगारवाढीवर तोडगा निघत नसल्याने संतप्त कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयापुढे निदर्शने केली. तर ट्रस्टने 3 टक्क्यांची दिलेली पगारवाढची ऑफर धुडकावून लावत, महागाईच्या काळात जीवन जगण्यासाठी व मुला-बाळांच्या शिक्षणासाठी योग्य पगारवाढ देण्याची मागणी युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.
या आंदोलनात लाल बावटाचे सचिव कॉ.ॲड. सुधीर टोकेकर, युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, सचिव विजय भोसले, सुभाष शिंदे, प्रवीण भिंगारदिवे, राधकीसन कांबळे, सुनीता जावळे, सुनील दळवी, अनिल फसले, संदीप शिंदे, देविदास ससाणे, हरिश पाटोळे, गजानन शेळके, राजू मोरे, बाबा कल्हापूरे आदींसह कामगार सहभागी झाले होते.
अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या तीन वर्षाच्या कराराची मुदत 31 मार्च 2023 मध्ये संपली आहे. युनियन व ट्रस्टमध्ये पुढील तीन वर्षासाठी करार होण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सुनावणी सुरु आहे. 2020 मध्ये झालेल्या करारात कामगारांना 4750 रुपयांची पगारवाढ देण्यात आली होती. गेल्या 20 वर्षापासून कामगार काम करत असून, सध्या कामगारांना 13 ते 15 हजार पगार आहे. या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने कामगारांनी 15 हजार रुपयांची पगारवाढ देण्याची मागणी केली आहे.
नुकतेच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ लिपिक भोसले यांच्यापुढे सुनावणी झाली. ट्रस्टचे विधी सल्लागार ॲड. अशोक पाटील यांनी आर्थिक परिस्थिती नसल्याने ट्रस्ट या नवीन करारात कामगारांना बेसिक रकमेवर प्रत्येक वर्षी 3 टक्के दरवाढ देण्याची कबुली दिली. मात्र युनियनच्या वतीने मागील करारामध्ये 4 हजार 750 रुपयांची पगारवाढ देण्यात आली होती. या रकमेच्या पुढे पगारवाढची बोलणी करात असाल तर कामगारांची सहमती असणार असल्याचे ॲड. सुधीर टोकेकर यांनी कामगारांच्या वतीने स्पष्ट करुन ट्रस्टने दिलेली पगारवाढची ऑफर अमान्य करण्यात आली.
सहा वर्षात ट्रस्टच्या वतीने दोन करार झाले. अत्यंत तटपुंज्या वेतनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील दोन करारात पगारवाढ देण्यात आली. तरी देखील ते 12 ते 14 हजार मासिक वेतनात काम करत आहे. महागाईच्या काळात या वेतनात त्यांचे भागत नसून, कुटुंबाचा उदरनिर्वाह, आई-वडिलांची देखभाल व मुला-बाळांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. संस्थेची एवढी देखील बिकट परिस्थिती नाही की, ती कामगारांना योग्य पगारवाढ देऊ शकत नाही. ट्रस्टने पुढाकार घेऊन मागील करारात दिलेल्या वेतनवाढीपेक्षा अधिक वेतनवाढ देऊन हा प्रश्न सोडविण्याची कामगारांची न्याय, हक्काची मागणी आहे. योग्य गव पगारवाढ होत नाही, तो पर्यंत कामगार वर्ग लोकशाही मार्गाने आपला हक्क मागणार आहे. -कॉ. ॲड. सुधीर टोकेकर (सचिव, लाल बावटा कामगार संघटना)
