• Tue. Jul 22nd, 2025

8 महिन्यापासून पगारवाढीचा करार होत नसल्याने अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचा ठिय्या

ByMirror

Dec 12, 2023

तोडगा काढण्यासाठी ट्रस्टला 15 दिवसाचे अल्टिमेटम; अन्यथा कुटुंबीयांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- कराराची अंतिम मुदत 8 महिन्यापूर्वी संपून देखील सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे पगारवाढीच्या नवीन करारावर सुरु असलेल्या सुनावणीत सात ते आठ तारखा होऊन देखील तोडगा निघत नसल्याने लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने सहाय्यक कामगार आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केला. तर नवीन करारासाठी 15 दिवसाचा अल्टिमेटम देऊन पुढील तारखेला करार न झाल्यास वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कुटुंबीयांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.


नवीन करार तात्काळ करुन पगार वाढ मिळण्यासाठी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात लाल बावटाचे सचिव कॉ.ॲड. सुधीर टोकेकर, युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, सचिव विजय भोसले, अनिल फसले, प्रवीण भिंगारदिवे, सुनील दळवी, सुनिता जावळे, राधाकिसन कांबळे, सुभाष शिंदे, प्रभावती पाचरणे आदींसह युनियनचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या तीन वर्षाच्या कराराची मुदत 31 मार्च 2023 मध्ये संपली आहे. युनियन व ट्रस्टमध्ये पुढील तीन वर्षासाठी करार होण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सुनावणी सुरु आहे. 2020 मध्ये झालेल्या करारात कामगारांना 4750 रुपयांची पगारवाढ देण्यात आली होती. महागाईच्या काळात कामगारांना जीवन जगणे अशक्य झाले असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मागील वेळी दिलेल्या 4750 पुढे वेतनवाढ मिळाल्यास कामगारांची सहमती असणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर ट्रस्टने 3 टक्क्यांची दिलेली पगारवाढची ऑफर कामगारांनी नाकारली आहे.


कॉ.ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, करारच्या तारखेला विश्‍वस्त फक्त प्रतिनिधी पाठवत असल्याने त्यावर चर्चा होऊन तोडगा निघत नाही. ट्रस्टमध्ये दोनशे ते सव्वादोनशे कामगार आहेत. त्यांचा पगार अत्यंत कमी असून, महागाईच्या काळात त्यांना जीवन जगणे देखील अवघड झाले आहे. विश्‍वस्तांनी कामगारांचा विचार करून तातडीने नवीन करारावर सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांवर आंदोलनाची वेळ आणू नये, असे त्यांनी सांगितले.


सतीश पवार म्हणाले की, सर्व कामगारांची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे. पगारातून मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. वारंवार तारखा सुरू असून, कामगारांच्या संयमाचा अंत पाहू नये. चर्चेने प्रश्‍न सोडवण्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपस्थित महिलांनी देखील करारावर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *