युवानच्या विद्या सहयोग अभियानांतर्गत वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक संचाचे वाटप
समाजाप्रती कर्तव्याची भावना ठेऊन प्रत्येकाने योगदान द्यावे -प्रतिभा धुत
अहमदनगर (प्रतिनिधी)- अनाथ, एकल पालक, दिव्यांग आणि आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देऊन शिक्षणाच्या प्रवाहात टिकवण्याचे कार्य करणाऱ्या युवान या सामाजिक संस्थेच्या वतीने विद्या सहयोग अभियानातंर्गत कोविड काळात पालक गमावलेल्या प्राथमिक ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संचाचे वाटप करण्यात आले. घरातील कर्ता व्यक्ती हयात असेपर्यंत शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला नवीन साहित्य मिळणारे शेकडो विद्यार्थी मागील 3 वर्षांपासून अशा साहित्यापासून वंचित होते. आपल्या पालकांप्रमाणे दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्याने अनेक एकल पालक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू भरुन आले.
सर्जेपूरा येथील शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फौंडेशन आणि श्री महावीर विद्या प्रसारक मंडळाच्या सहयोगातून सुरु असणाऱ्या युवान संचलित छात्र निवास येथे सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा धुत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ॲड. श्याम असावा, सपना असावा, हेमंत लोहगावकर, जीतमल असावा, अशोक कुटे, दत्ता उरमुडे, युवानचे संस्थापक संदिप कुसळकर, सुरेश मैड आदींसह विद्यार्थी व एकल पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात संदिप कुसळकर यांनी अनाथ, एकल पालक, दिव्यांग आणि आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनाने सक्षम करुन समाजात उभे करण्याचे काम युवान करत आहे. उच्च शिक्षणाबरोबरच त्यांच्यात रोजगारपुरक कौशल्य निर्माण करुन आत्मविश्वास निर्माण केला जात असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी युवानच्या विविध सेवाभावी उपक्रम व कार्याची माहिती दिली.

प्रतिभा धुत म्हणाल्या की, समाजाप्रती कर्तव्याची भावना ठेऊन प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. सामाजिक योगदान फक्त पैश्याचे नसून, श्रमदान व मार्गदर्शनाने देखील योगदान दिल्यास समाजाला आधार मिळणार आहे. गरज तेथे मदत देण्याचे कार्य युवान करत आहे. विद्यार्थी हे भविष्यातील सक्षम भारत घडविणार आहे. त्यांना सक्षम करुन देश निर्माणाचे कार्य सर्वांना हाती घ्यावे लागणार आहे. प्रत्येकाने आपल्या परीने सामाजिक योगदान द्यावे. मदत घेणाऱ्यांनी देखील भविष्यात मदतीची परतफेड इतरांना मदत करुन करण्याचे त्यांनी आवाहन केले.
ॲड. श्याम असावा यांनी जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपली भूमिका बजवावी. मदत घेताना मदत देणारे देखील बना. प्रत्येकाला एकमेकांची मदत लागत असते. सहकार्याच्या भावनेने समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युवानच्या विद्या सहयोग अभियानातंर्गत कोविड काळात पालक गमावलेले तसेच युवान छात्र निवास मधील उच्च शिक्षण, स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण घेत असलेल्या 200 विद्यार्थी, विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्याचे किट उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आभार सुरेश मैड यांनी मानले.