• Thu. Oct 16th, 2025

आगडगावच्या विष्णू कल्पवृक्षावर पक्ष्यांसाठी घरट्यांची व्यवस्था

ByMirror

Jul 10, 2024

सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचा उपक्रम

पर्यावरण संवर्धनाबरोबरच पशु-पक्ष्यांना वाचविण्यासाठी भालसिंग यांचे कार्य निसर्गपूजेचे -बलभीम कराळे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आगडगाव (ता. नगर) येथील श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानच्या (ट्रस्ट) निसर्गरम्य परिसरात असलेल्या विष्णू कल्पवृक्षावर पक्ष्यांसाठी घरट्यांची व्यवस्था करण्यात आली. पर्यावरण मित्र तथा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी पावसाळ्यात पक्ष्यांची घरटी उपलब्ध करुन देण्याची मोहिम हाती घेतली असून, या उपक्रमातंर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.


श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे यांच्या हस्ते विष्णू कल्पवृक्षावर पक्ष्यांसाठी घरटी टांगण्यात आले. यावेळी देवस्थानचे विश्‍वस्त, कर्मचारी व सेवेकरी उपस्थित होते. उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी भालसिंग यांनी श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानच्या परिसरात विविध ठिकाणी झाडावर भांडी लटकवून धान्य व पाण्याची व्यवस्था केली होती. तर पावसाळ्यात त्यांनी पक्ष्यांसाठी नारळाच्या सालीपासून बनवलेले कृत्रिमरित्या बनवलेले व वॉटरप्रुफ असलेले हुबेहुब सुगरणीचे घरट्यांची व्यवस्था करुन दिली आहे. पशु-पक्ष्यांची काळजी घेत, भालसिंग यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.


बलभीम कराळे म्हणाले की, पर्यावरण संवर्धनाबरोबरच पशु-पक्ष्यांना वाचविण्यासाठी भालसिंग यांचे निसर्गपूजेचे कार्य सुरु आहे. वृक्षरोपणाबरोबरच व पशु-पक्ष्यांसाठी त्यांनी घेतलेल्या उपक्रमातून प्रेरणा मिळणार आहे. पक्ष्यांना हक्काचा निवारा देण्याचे काम त्यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.


विजय भालसिंग म्हणाले की, विविध ठिकाणी उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांसाठी अन्न-पाण्याची सोय केल्यानंतर त्या परिसरात पक्ष्यांची संख्या वाढली आहे. त्याच भागात त्यांना घरट्यांची व्यवस्था करुन देण्याचा उपक्रम सुरु आहे. पावसाळ्यात वारा आणि जोरदार पावसाने त्यांची घरटी टिकत नसून, त्यांच्यासाठी कृत्रिमरित्या बनवलेल्या हुबेहुब सुगरणीच्या घरट्यांची व्यवस्था करुन दिली जात आहे. या उपक्रमातून पक्ष्यांची कमी होणारी संख्या वाढण्यास मदत होणार असून, या उपक्रमास लोकसहभागाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *