• Tue. Jul 22nd, 2025

बसपाच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

ByMirror

Nov 26, 2023

29 नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या पक्षाच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

घराणेशाही, भ्रष्टाचार व जातीयवादी पक्षांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बसपाचा पुढाकार -काळूराम चौधरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांच्या हातात सत्ता देण्यासाठी बहुजन समाज पार्टी सर्वसामान्यांमध्ये नेतृत्व विकसित करत आहे. घराणेशाही, भ्रष्टाचार व जातीयवादी पक्षांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बसपाने पुढाकार घेतला आहे. आंबेडकरी विचाराने पक्षाचे कार्य सुरु असून, सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु असल्याचे प्रतिपादन बसपाचे प्रदेश सचिव काळूराम चौधरी यांनी केले.


बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत अध्यक्षीय भाषणात बसपाचे प्रदेश सचिव चौधरी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा प्रभारी सुनील ओव्हळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, जिल्हा महासचिव राजू शिंदे, जिल्हा बीव्हीई दत्तात्रय सोनवणे, विधानसभा अध्यक्ष संतोष क्षेत्रे, राहुरी विधानसभा अध्यक्ष संजय संसारे, अकोले विधानसभा प्रभारी प्रकाश अहिरे, साहेबराव मनतोडे, कैलास कोळगे, महिला शहराध्यक्षा अंजूम सय्यद, नामदेव जाधव, अन्वर शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे चौधरी म्हणाले की, पक्षाचे विचार व ध्येय-धोरण जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचे काम कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. 29 नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या पक्षाच्या मेळाव्याला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.


या बैठकीमध्ये 29 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्या सभेसाठी नगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होण्यासाठी नियोजन करण्यात आले. तर शहर प्रभारीपदी शहानवाज महेबूब शेख, विधान सभा कोषाध्यक्षपदी बाळासाहेब काते, शहर कोषाध्यक्षपदी सचिन उत्तम जाधव, विधानसभा सचिवपदी अमिर अन्वर खान यांची नियुक्ती करण्यात आली.


सुनील ओव्हळ यांनी बहुजन समाज पार्टी दीन-दुबळ्यांच्या सेवेसाठी कार्य करत आहे. जातीयवादी व भ्रष्टाचारी पक्षांना बसपा सक्षम पर्याय आहे. जिल्ह्यात बसपाचे संघटन मजबूत होत असून, येत्या निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवून देणार आहे. सर्वजन हिताय, या भावनेने प्रत्येक बसपाचा कार्यकर्ता काम करत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने नगर जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


उमाशंकर यादव म्हणाले की, गल्ली पासून दिल्ली पर्यंत भ्रष्टाचार व जातीयवादाने देश पोखरला जात आहे. शेतकरी, युवक व कामगारांच्या प्रश्‍नापेक्षा जातीयवादी मुद्दे उपस्थित करुन सर्व प्रश्‍नांना बगल दिली जात आहे. मात्र बसपा जातीयवादी प्रवृत्तींना थारा न देता, समाजातील प्रश्‍न जनतेपुढे घेऊन जाऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *