स्मार्ट शिक्षणाने भावी पिढीचे भवितव्य घडणार -आ. संग्राम जगताप
गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या पर्वाला प्रारंभ
नगर (प्रतिनिधी)- नगर (प्रतिनिधी)- केडगावच्या भूषणनगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सीबीएससी बोर्डाच्या एपेक्स मॉडेल इंग्लिश स्कूल या इंग्लिश माध्यमाच्या शाळेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्यावत डिजीटल प्रणालीने शिक्षण दिले जाणार आहे.
याप्रसंगी उद्योजक राजेंद्र शिंदे , मंगलबाई पटवा, इंजि. पटवा, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे (रयत शिक्षण संस्था), श्री. दिपकअण्णा लंके,मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, माजी नगरसेवक सुनिल कोतकर, संभाजी पवार, लीलाबाई सातपुते, लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, सुनील सातपुते, स्कूलचे संचालक किसन सातपुते आदींसह सातपुते परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, उपनगरात वाढत्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी एपेक्स मॉडेल इंग्लिश स्कूल हे निश्चितच दिशादर्शक ठरेल. स्मार्ट शिक्षण काळाची गरज असून, त्याने भावी पिढीचे भवितव्य घडणार आहे. आजच्या युगात बहुभाषिकतेसोबत इंग्रजी व मातृभाषा असलेल्या मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. किसन सातपुते यांच्याकडून उत्कृष्ट शैक्षणिक कार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
पद्मश्री पोपटराव पवार यांनी टेक्नोलॉजी आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज अधोरेखित करत म्हटले, पूर्वीचे छडीचे शिक्षण आणि आजचे टेक्निकल शिक्षण यातील बदल लक्षात घेता पालकांच्या अपेक्षा बदलल्या आहेत. एपेक्स शाळेच्या नावातच मॉडेल हा दृष्टिकोन आहे. अशा शाळांमधून आदर्श, सुसंस्कृत, जीवनाभिमुख पिढी घडेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर मुलांना परिस्थितीनुसार घडू द्या. परिस्थितीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्षम करा. दर्जेदार शिक्षण काळाची गरज बनली असून, त्याला कौशल्याची जोड देणे देखील महत्त्वाचे आहे. मुलांमधील कला-कौशल्यांना प्रोत्साहन देवून त्यांना मैदानाकडे वळवा. मैदानी खेळातून विद्यार्थी सक्षमपणे घडणार असल्याचे सांगून, योग्य, ध्यान-धारणेचे धडे देण्याचे त्यांनी आवाहन केले.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी सांगितले की, शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्या बदलांना स्वीकारून शाळा आणि शिक्षकांनी आधुनिकतेकडे वाटचाल करणे काळाची गरज आहे. एपेक्स स्कूल त्याचे उत्तम उदाहरण ठरेल, असे त्यांनी सांगितले.
किसन सातपुते यांनी एपेक्स मॉडेल इंग्लिश स्कूल ही केडगावसाठी एक नवी शैक्षणिक संधी असून गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि मूल्याधारित शिक्षणासाठी ती एक आदर्श ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकासाहेब वाळुंजकर यांनी केले. या उद्घाटन समारंभाला परिसरातील पालक, विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.