जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे झालेल्या काव्य संमेलनात शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांच्या हस्ते काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, काव्य संमेलनाचे अध्यक्ष गीताराम नरवडे, संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे आदी उपस्थित होते.
अनिता काळे या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करुन शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण मोहिम चालवित आहे. तर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी शाळेचा कायापालट केला आहे. महिला सक्षमीकरणाचे कार्य करुन त्यांनी उत्तम प्रकारे महिलांचे संघटन केले आहे. व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे.
या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
