रुग्णालयात नाव देण्यात आलेल्या भगवान रंगनाथ कुलकर्णी कक्षाचे अनावरण
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सत्पात्री दान करुन समाधान मिळते -प्रमिलाताई कुलकर्णी
अहमदनगर (प्रतिनिधी)- दान नेहमीच सत्पात्री असावे. जिथे गरज आहे, तेथे दान दिले गेल्यास त्याचा गरजूंना फायदा होतो. आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन मिळत आहे. या आरोग्य मंदिरातून मानवसेवा घडत असून, या ठिकाणी सत्पात्री दान करुन समाधान मिळत असल्याची भावना भिंगार कॅन्टोमेंटच्या माजी मुख्याध्यापिका प्रमिलाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटर मध्ये सामाजिक भावनेने सुरु असलेल्या आरोग्य कार्याला हातभार लावण्यासाठी सोसायटी ट्रेनिंग कॉलेजचे माजी प्राध्यापक स्व. भगवान रंगनाथ कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी प्रमिलाताई कुलकर्णी यांनी आर्थिक मदत दिली. यावेळी त्या बोलत होत्य. तसेच स्व. भगवान रंगनाथ कुलकर्णी यांच्या नाव देण्यात आलेल्या रुग्णालयातील कक्षाचे यावेळी अनावरण करण्यात आले. याप्रसंगी कृषी अधिकारी विनायक देशमुख, संगीता देशमुख, वल्लरी निसरगंड, वंदना जोशी, आनंदराव जोशी, उमाकांत पावसे, सुमती देशमुख, मनीषा मुळे, तृप्ती देवचक्के, समीर कुलकर्णी, डॉ. रमाकांत पावसे, कुमुद कुलकर्णी, डॉ. आशिष भंडारी, पेमराज बोथरा, डॉ. वसंत कटारिया, प्रकाश छल्लाणी, सुभाष मुनोत, बाबुशेठ लोढा, पोपटशेठ लोढा, वसंत चोपडा, डॉ. विजय भंडारी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाल्या की, पतीच्या स्मरणार्थ समाजकार्य सुरु आहे. यापूर्वी देखील आनंदऋषीजी हॉस्पिटलला रुग्णवाहिका देण्यात आलेली असून, तसेच अनामप्रेम संस्थेतील अंध व दिव्यांग मुलांसाठी भोजनालय बांधून देण्यात आले. तसेच शिक्षण क्षेत्रातही कार्य करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

प्रास्ताविकात डॉ. वसंत कटारिया म्हणाले की, श्रीमंत व्यक्ती संपत्ती मधील थोडाफार वाटा दान करत असतात. मात्र कुलकर्णी हे सर्वसामान्य कुटुंबातील असताना देखील संपत्तीमधील 90 टक्के वाटा त्यांनी दान केलेला आहे. त्यांची ही देणगी हॉस्पिटलसाठी महत्त्वाची आहे. पतीला ह्रद्यविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांनी 2009 मध्ये हॉस्पिटलला रुग्णवाहिका दिलेली आहे. पुन्हा त्या आर्थिक मदत घेऊन या रुग्णसेवेला हातभार लावण्यास आल्या. मदतीवर हॉस्पिटलचे सेवाभावाने कार्य सुरु असून, सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
उमाकांत पावसे म्हणाले की, कबाड, कष्ट करुन गरिबीला झुंज देऊन कुलकर्णी दांम्पत्य पुढे आले. मात्र सामाजिक संवेदना जागरुक ठेऊन त्यांनी कार्य केले. उतार वयात देखील त्यांचा समाजकार्यासाठी असलेली तळमळ प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
विनायक देशमुख यांनी कुलकर्णी दांम्पत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर प्रमिलाताई यांचे धार्मिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान स्फुर्ती देणारे असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.