मित्राला भेटण्यास आलेल्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन केले अपमानित
अहमदनगर (प्रतिनिधी)- मित्राला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ करुन धमकावल्याप्रकरणी बाराबाभळी येथील वाघस्कर कुटुंबातील 8 व्यक्तींवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये (ॲट्रॉसिटीचा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप परशुराम वाघचौरे (रा. दरेवाडी) व सुधीर आनंदा गायकवाड हे दोन्ही मित्र 18 नोव्हेंबर रोजी मोटारसायकलवर चांदबिबी महाल येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून परत येताना त्यांनी बाराबाभळी येथे राहत असलेल्या शंकर भानुदास कवडे या मित्राच्या घरी भेटण्यासाठी आले होते. वाघचौरे कवडे यांच्याशी बोलत असताना त्यांच्या शेजारी राहणारा रावसाहेब वाघस्कर तेथे आला व बाहेरचे लोक घेऊन येऊन दमदाटी करतो का? असे सांगून जातीवाचक शिवीगाळ करु लागला. तर त्याचे भाऊ व भावजय यांना येथे बोलावून घेऊन शंकर कवडे यांना शेतीच्या बांधावरुन शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच सर्वांसमोर अपमान होईल अशा पध्दतीने हिन शब्दात जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली असल्याचे फिर्यादीत संदीप वाघचौरे यांनी म्हंटले आहे.
वाघचौरे यांच्या फिर्यादीवरुन 18 नोव्हेंबरला रावसाहेब गणपत वाघस्कर, अशोक मच्छिंद्र वाघस्कर, अजय बबन वाघस्कर, विजय बबन वाघस्कर, सुरेखा विजय वाघस्कर, जालिंदर गणपत वाघस्कर, वैशाली रावसाहेब वाघस्कर, आक्का जालिंदर वाघस्कर (सर्व रा. बाराबाभळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
