• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

लोकशाही राबविण्यासाठी अलार्म कॉल चळवळ सुरु

ByMirror

Nov 15, 2024
जनहिताच्या योजना व आधुनिक संकल्पनाची केली जाणार नोंद

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार

मूलभूत कर्तव्य टाळणाऱ्यांचे सामाजिक अवमूल्यन करण्याचा नामी प्रयोग

नगर (प्रतिनिधी)- घराघरात आणि राज्यभरात मूलभूत कर्तव्य टाळणाऱ्यांचे सामाजिक अवमूल्यन करण्याचा नामी प्रयोग म्हणून पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने हसत खेळत लोकशाही अलार्म कॉल (धोक्याची घंटा) चळवळ सुरु करण्यात आली आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय संविधानातील कलम 51 अ खालील मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून आणि योग्य उमेदवाराला निवडून येण्याची संधी मिळावी म्हणून ही चळवळ राबविली जाणार आहे. या चळवळीच्या माध्यमातून मूलभूत कर्तव्य टाळणाऱ्या नागरिकांच्या विरोधात जनतेला अलार्म कॉल दिला जाणार आहे.


सन 1977 साली भारतीय संविधानात दुरुस्ती करून कलम 51 अ मूलभूत कर्तव्य संदर्भातील भाग दाखल करण्यात आला. परंतु गेली 47 वर्षे हा मूलभूत कर्तव्याचा भाग कायद्याने किंवा कोर्टामार्फत राबविता आला नाही. परंतु या संघटनांच्या माध्यमातून या कलमाची अंमलबजावणी उन्नत चेतनेचे राज्य या तंत्रातून सुरू केली आहे. जंगलामध्ये गवतात लपून बसलेल्या जंगली श्‍वापाद किंवा वाघाबद्दल इतर प्राण्यांना माहिती करण्यासाठी पक्षी अलार्म कॉल करतात. यामुळे जवळ असलेल्या प्राण्यांना सावध होऊन आपला जीव वाचवता येतो. या तंत्राचा वापर या संघटनेने संपूर्ण समाजात सुरू केला असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.


मतकोंबाड, सत्तापेंढारी, लोकमकात्या ओळखा आणि शेजाऱ्याला कळवा असा प्रयोग नागरिकांनी आणि मतदारांनी आपल्या परिसरात सुरू ठेवावा, ज्यामुळे सत्तापेंढारी उमेदवाराविरुद्ध डिच्चू कावा, डिच्चू फत्ते करण्याची उर्मी मतदारांमध्ये निर्माण होईल. या तंत्राच्या वापरामुळे लोकशाही अधिक बळकट करता येणार आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य टाळणाऱ्यांचे सामाजिक अवमूल्यन करून त्यांना डब्यात टाकता येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


समाज काय म्हणेल? लोक काय म्हणतील? या गोष्टीला समाजामध्ये फार मोठी किंमत आहे. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेपेक्षा लोक काय म्हणतील? ही शिक्षा फार मोठी आहे. यातूनच समाजामध्ये उन्नत चेतनेचे राज्य व्यापक होऊ शकणार आहे. असे करण्यासाठी नागरिकांमध्ये सर्वत्र मिसळून अलार्म कॉल राबविण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी ॲड कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *