राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
स्वामिनी जेजुरकर हिला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेट मुलींच्या संघाने राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली आहे. सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने 18, 19 व 20 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या 19 वर्षांखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगरच्या मुलींनी आपले वर्चस्व दाखवून उत्कृष्ट कामगिरी केली.
या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल 24 जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले होते. अहिल्यानगर जिल्ह्याच्या मुलींच्या व मुलांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक लढतींमध्ये अहिल्यानगरच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळविले.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण संघ सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, राहुरी कृषी विद्यापीठ या शाळेचा असून, मागील वर्षी अमरावती येथे झालेल्या शालेय राज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतही या संघाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदाही त्याच सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर त्यांनी सलग तिसऱ्यांदा राज्यविजेतेपद मिळवून इतिहास घडविला आहे.
अंतिम सामना सातारा जिल्ह्याच्या संघासोबत अतिशय अटीतटीचा ठरला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अवघ्या एक धावेने अहिल्यानगरच्या मुलींच्या संघाने विजय मिळवत तिसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. या विजयात संघाच्या कर्णधार स्वामिनी कविता गोरक्षनाथ जेजुरकर हिने उत्कृष्ट नेतृत्व करत उल्लेखनीय भूमिका बजावली. तिच्या उत्कृष्ट खेळासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वृषाली पारधी हिला तिच्या दमदार कामगिरीसाठी ‘वूमन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
या शानदार कामगिरीच्या जोरावर अहिल्यानगरच्या मुलींच्या संघाची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थिनींच्या या ऐतिहासिक यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास खर्चे, सभापती डॉ. प्रमोद रसाळ, सचिव डॉ. महानंदजी माने, खजिनदार महेश घाडगे, विद्यालयाचे प्राचार्य अरुणजी तुपविहीरे, उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
याशिवाय टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया तसेच महाराष्ट्राच्या सचिव मीनाक्षी गिरी, सहसचिव चंद्रकांत तोरणे, अहिल्यानगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष केशव नागरगोजे, खजिनदार संदीप घावटे यांनीही संघाचे कौतुक केले. विद्यार्थिनींना शाळेचे क्रीडाशिक्षक व प्रशिक्षक घन:श्याम सानप, संतोष जाधव, राष्ट्रीय टेनिस क्रिकेट खेळाडू अक्षदा बेल्हेकर तसेच शहर टेनिस क्रिकेट सचिव प्रसाद सामलेटी, नितीन केने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मुलींचा विजयी संघ :
स्वामिनी जेजुरकर (कर्णधार), वृषाली पारधी, तृप्ती उगलमुगले, प्रणाली पानसंबळ, सिमरन शेख, नशरा सय्यद, संतोष भिसे, मृणाल ननवरे, श्रेया सोनवणे, धनश्री पवार, राशि पवार, धनश्री शेडगे, लक्ष्मीप्रिया म्हसे, आदिती गुंजाळ, अमृता ढगे, श्रावणी अडसुरे.
