विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने गौरविले जाणार
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे रविवार दि. 6 जुलै रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.
ॲड. सुरेश लगड ज्येष्ठ विधीज्ञ असून, ते विशेष सरकारी वकील म्हणून जिल्हा न्यायालयात कार्यरत आहे. सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे मोठे योगदान असून, विविध सामाजिक संघटना त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यात ॲड. लगड यांच्या हस्ते सामाजिक, साहित्य, आरोग्य, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योग व पर्यावरण आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जगद्गुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार, वारकरी भूषण, राजश्री शाहू महाराज समाजभूषण, समजारत्न पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.