केडगावमध्ये श्री अंबिका विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
रयत शिक्षण संस्थेत एआय आधारित शिक्षणाची नवी दिशा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तंत्रज्ञानाच्या युगात आपल्यासमोर अनेक नवीन आव्हाने उभी राहत आहेत. या बदलत्या काळाशी जुळवून घेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार करणे ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आज सर्व क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणत आहे. शिक्षण क्षेत्रातही एआयचा उपयोग करून विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ, दर्जेदार आणि आधुनिक करण्याचे प्रयत्न रयत शिक्षण संस्थेमार्फत सुरू झाले असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी केले.
केडगाव येथील श्री अंबिका प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी खा. शरद पवार बोलत होते. प्रारंभी कोनशीलेचे अनावरण आणि फीत कापून नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर पाहुण्यांच्या हस्ते विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. रयत शिक्षण संस्था (सातारा) चे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी खासदार निलेश लंके, विभागीय चेअरमन आशुतोष काळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा.आ. दादाभाऊ कळमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर, पद्मश्री पोपट पवार, ॲड. भगीरथ शिंदे, डॉ. अनिल पाटील, मा.आ. राहुल जगताप, बाबासाहेब भोस, विकास देशमुख, रयतचे उत्तर विभाग अधिकारी प्राचार्य नवनाथ बोडखे, शिवलिंग मेनकुदळे, राजेंद्र मोरे, बंडू पवार, संजय नागपूरे, तुकाराम कन्हेरकर, डॉ. मेहेरनोश मेहता, जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, शिवाजीराव भोर, ज्ञानदेव पांडूळे, अर्जुन पोकळे, अंबादास गारुडकर, हाजी शौकत तांबोळी, आदींसह स्कूल कमिटी व सल्लागार समितीचे सर्व सदस्य, रयत सेवक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे खा. शरद पवार म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेने लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवला आहे. शेती क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा चांगला वापर होऊ शकतो. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी, या संकटावर मात करून शेतकऱ्यांनी पुढे जाण्याचे आवाहनही त्यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक मिशन घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला. यामुळे नवीन पिढी तयार झाली. त्याचा परिणाम अनेक मुले-मुली या वटवृक्षाखाली शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी झाले. संस्थेचा कारभार विस्तारित करण्यासाठी अनेकांनी योगदान दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अधिकारी प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी विद्यालयाच्या स्थापनेपासून ते नव्या वास्तूच्या उभारणीपर्यंतचा प्रवास सांगितला. सन 1969 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी 3 कोटी 81 लाख रुपये खर्च करून सर्व सुविधा असलेले अत्याधुनिक संकुल उभारण्यात आले आहे. कला शिक्षकांनी विद्यालयाचे परिसर सजविण्यात मोलाचे योगदान दिले असून, सर्व देणगीदार व सहकार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले, तर एआय उपकरणे आणि रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटनही या प्रसंगी करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागास संस्थेचा आदर्श विभागीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार अशितोषजी काळे व प्राचार्य नवनाथ बोडखे यांचा खा. शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी इमारत उभारणीस योगदान देणारे व देणगीदारांचा विशेष सत्कार करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी म्हणाले की, या शाळेच्या इमारतीचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असून, भविष्यात इतर शाळांसाठी हे संकुल एक मॉडेल ठरेल. संस्थेच्या माध्यमातून रोबोटिक, थ्रीडी पेंटिंग, कोडिंग इत्यादी शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. हा अभ्यासक्रम इतर संस्था देखील मागत असून, यावरुन संस्थेच्या गुणवत्ता व नवीन शैक्षणिक धोरणाचा केलेला अवलंब लक्षात येत आहे. लवकरच एआरपीद्वारे सर्व काम पेपरलेस करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब जगदाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
