रिपाई महिला आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- गोरक्षकाच्या नावाखाली हल्ले करुन दिवसाढवळ्या हातात शस्त्र घेऊन दहशत पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तर गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, मात्र कायदा हातात घेऊन समाजात तणाव निर्माण करणाऱ्यांना रोखण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
रिपाईच्या शिष्टमंडळाने या संदर्भात पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, सोनाली भाकरे, ललिता ठोंबरे, सोनाली पवार, अर्चना भाकरे, सुशिला भाकरे, अलका भाकरे, स्वाती भाकरे, सोनाली भाकरे, सुशिल पगारे, साई साळवे, अमृता पवार, सुधीर गायकवाड, अनिकेत पवार, दानिश शेख आदी उपस्थित होते.
नागापूर परिसरामध्ये मटन विक्रीची काही दुकाने सुरु आहेत. सदर दुकाने असणाऱ्या ठिकाणी मागासवर्गीय समाजाची लोकवस्ती आहे. त्या ठिकाणी लहान मुले, महिला, पुरुष यांचा वावर आहे. काही महिन्यांपूर्वी काही युवक तोंडाला कपडे बांधून अतिवेगाने दोन चाकी वाहनांवर हातात लोखंडी रॉड, लाकडी दांडके व काहींनी हातात धारदार शस्त्र घेऊन आले होते. त्यांनी मटन विक्री करत असलेल्या दुकानातील कामगारांना बेदम मारहाण केली. यामुळे या परिसरातील महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठी भिती निर्माण झाली होती.
पोलीस प्रशासनाने घटनास्थळी येऊन फक्त मटन विक्रेते यांच्यावरच कारवाई केली. परंतु ज्यांनी मारहाण केली त्यांना तसेच सोडून देण्यात आले. गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेण्याची परवानगी पोलीस प्रशासनाने गोरक्षकांना दिली आहे का? असा प्रश्न रिपाईच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
दुकानदार गोमांस विक्री करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई आवश्य व्हावी. मात्र वाहनांवर वसाहतीमध्ये येऊन हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांना पोलीसांनी मोकळीक देऊ नये. यामुळे सामाजिक वातावरण बिघडत आहे. गोमांस विक्री करणाऱ्यांना मारहाण करताना एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव जाण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर गोरक्षकाच्या नावाखाली नागरिकांच्या वसाहतीमध्ये घुसून हल्ले करुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न झाल्यास रिपाई महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
