ज्ञानरचना सोशल फाउंडेशनने केला विविध क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान
निस्वार्थ सामाजिक कार्य पुढे आल्यास इतरांना प्रेरणा मिळणार -पद्मश्री राहीबाई पोपरे
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक व उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार आहे. त्यांचे कार्य समाजापुढे आल्यास इतरांना प्रेरणा मिळणार असल्याचे प्रतिपादन पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी केले. तर सदृढ पिढीसाठी मातीचा अभिमान बाळगा, माती वाचवा व चांगले विषमुक्त अन्न पिकवण्याचा संदेश त्यांनी दिला.
ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने सावेडी येथील माऊली सभागृहात राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात पद्मश्री पोपरे बोलत होत्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सीए शंकर अंदानी, प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका सरोज अल्हाट, सामाजिक कार्यकर्ते अमोल आल्हाट, आर्चिड प्री स्कूलच्या प्राचार्या शितल साळवे, ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या संचालिका सुप्रिया चौधरी, सारिका शेलार, संचालक प्रवीण साळवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे पद्मश्री पोपरे म्हणाल्या की, निसर्गाची जी शाळा शिकले, ते समाजापुढे मांडत आहे. केमिकलयुक्त रासायनिक खतामुळे आजार वाढले असून, पुन्हा सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी वळावे लागणार आहे. माती वाचली तर पुढची पिढी वाचणार आहे. माती चांगली राहिली तर चांगले अन्न येणार आणि चांगल्या अन्नातून भारताची सक्षम पिढी घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. विषमुक्त अन्नासाठी त्यांनी सेंद्रिय खतांचा अवलंब करून शेती करण्याचे आवाहन केले.
राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्ड सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकात प्रविण साळवे यांनी ज्ञानरचना सोशल फाउंडेशन चे शैक्षणिक साहित्य बँक, गरजू महिलांसाठी शिवण प्रशिक्षण, ग्रामीण भागामध्ये सर्पदंश व उपचार या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन या सर्व विविध उपक्रमांची माहिती देत, समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. तर इतरांचे समाजकार्य सर्वांपुढे जाऊन समाजाला एक दिशा मिळण्याचा हेतू त्यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचिका भोंडवे यांनी केले, तर आभार सारिका शेलार यांनी मानले.
राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्ड 2025 विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कलाविष्कार पुरस्कार नृत्य विशारद प्रियंका देवरे (चाळीसगाव), लावणी सम्राट दिगंबर पवार (सोलापूर).
आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार गजानन हलगे (हिंगोली), दत्तात्रेय आभाळे (अहिल्यानगर).
महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार साईनाथ धनवटे (राहता).
महाराष्ट्र एनजीओ आयकॉन अवॉर्ड स्व. पांडुरंग (भाऊ) उपाळे बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था (माढा, जि. सोलापूर), प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान (करमाळा, जि. सोलापूर).
समाज रत्न पुरस्कार, अतुल बुर्से (हिंगोली), डॉ. उद्धव शिंदे (अहिल्यानगर), सुजाता डेरे (म्हस्केवाडी, पारनेर), निर्मला गाडेकर (चोंभूत,पारनेर).
सोशल वर्कर आयकॉन पुरस्कार स्वाती राठोड (यवतमाळ), रवींद्र दुशिंग (राहता).
राज्यस्तरीय उपक्रमशील ग्रामपंचायत पुरस्कार अंबोडा ग्रामपंचायत (यवतमाळ), महाराष्ट्र उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ऋषिकेश थोरात (अहिल्यानगर).