ग्रामीण भागात केलेल्या विकासात्मक कार्याची दखल
नगर (प्रतिनिधी)- हिंगणगाव (ता. नगर) येथील लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे राज्य कोअर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे पाटील यांचा युवा महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025 ने गौरव करण्यात आला. ग्रामीण भागात कायापालट करण्याच्या उद्देशाने केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
पुणे, शिवाजीनगर येथील पंडित जवाहरलाल सभागृहात सिने अभिनेत्री साराह मोतीवाला यांच्या हस्ते सोनवणे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे, संस्थेचे राज्य सचिव गणेश विटकर, उद्योजक एस.एस. सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
आबासाहेब सोनवणे यांचे वडील नगरपंचायत समिती माजी उपसभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कै. भास्करराव पाटील सोनवणे यांनी 35 वर्ष सरपंचपद भूषविले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आबासाहेब सोनवणे गावाच्या विकासासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. मागील 25 वर्षात अथकपणे केलेल्या जपसंधारणाच्या कामामुळे दुष्काळी गावाची ओळख पुसून त्यांनी गाव पाणीदार केले आहे. हिंगणगावमध्ये 11 बंधारे बांधून नदीचे 9 किलोमीटर पर्यंत खोलीकरण केले आहे. कुरणमळा या ठिकाणी नदीजोड प्रकल्प राबवून शिवारातील वाहून जाणारे पाणी एकत्रित करून बंदपाईपद्वारे बंधाऱ्यात सोडले आहे. जलयुक्त शिवार योजनेचे काम त्यांनी गावात सक्षमपणे राबविले. नदी व बंधारे गाळमुक्त करून पाणीदार गावाचे स्वप्न यशस्वीपणे पूर्ण केले.
स्मशानभूमीचे नूतनीकरण, झाडांची लागवड, रस्ते मजबुतीकरण, डांबरीकरण, शाळा व अंगणवाड्यांसह गावातील विविध मुलभूत प्रश्न सोडवून गावाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. रयत शिक्षण संस्थेवर 30 वर्षापासून सदस्य म्हणून काम करत आहे. गावाबरोबर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांना एकत्रित करून सरपंच परिषदेच्या तालुका अध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली. शासन दरबारी अनेक प्रश्न मांडून त्याची सोडवणूक केली. त्याच माध्यमातून ते महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर त्यांना नाशिक येथील ब्लू स्टार इव्हेंटचा राष्ट्रीय दिव्य प्रतिभा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आरोग्य मंत्री प्रकाश आदिरकर, विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदचे आमदार श्रीकांत भारती, आमदार सदाभाऊ खोत, आ. सुरेश धस, आ. शिवाजी कर्डिले, आ. आशुतोष काळे, आ. काशिनाथ दाते, खासदार निलेश लंके, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, मा.आ. दादाभाऊ कळमकर, रयतचे उपाध्यक्ष ॲड. भगीरथ शिंदे, खासदार बजरंग सोनवणे, आ. शरद सोनवणे, पद्मश्री पोपटराव पवार, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, उपाध्यक्ष विलास जाधव, सचिव राजू पोतणीस, राज्य कोर कमिटी उपाध्यक्ष जे.डी. टेमगिरे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हाध्यक्ष अर्जुन देवा शेळके यांनी अभिनंदन केले.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी सौ. स्मिता सोनवणे, घोडगंगा कारखान्याचे संचालक कैलास पाटील सोनवणे, नाबार्ड बँकेचे बबनराव सोनवणे, उद्योजक अमोल सोनवणे, संतोष सोनवणे, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जयंतराव नलावडे, सामाजिक कार्यकर्ते निसार पठाण उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल सोनवणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ज्या जनतेने सलग 25 वर्षे काम करण्याची संधी दिली, त्यामुळे गावामध्ये विकास कामे करू शकलो. गावाचा चेहरा-मोहरा बदलून गावाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे भाग्य लाभले. हा पुरस्कार एकट्याचा नसून संपूर्ण ग्रामस्थांना समर्पित आहे. -आबासाहेब सोनवणे (राज्य कोअर कमिटी अध्यक्ष, सरपंच परिषद)