अखंडित 24 तास वीजपुरवठ्याची मागणी; आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा
विद्युत महावितरणकडून नगरकरांची पिळवणुक -भरत खाकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील अनेक नागरिकांना अलीकडच्या काळात विद्युत बिल दहा पटीने वाढून येत असल्याचा धक्का बसला आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे आणि चुकीची बिलिंग प्रणाली याविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर विद्युत महावितरण कार्यालयात निवेदन देत नागरिकांना योग्य बिल आणि अखंडित 24 तास वीजपुरवठ्याची मागणी करण्यात आली. यामध्ये सुधार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आपच्या शिष्टमंडळाने विद्युत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विशाल बोंदर्डे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला अध्यक्षा ॲड. विद्या शिंदे, महासचिव दिलीप घुले, युवा उपाध्यक्ष विजय लोंढे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नुकतेच शहरातील देवेंद्र सहाणे यांना दहा पटीने वाढीव बिल आले, तसेच इतर अनेक नागरिकांनाही अशाच प्रकारे वाढीव वीजबिलांचा फटका बसत आहे. नागरिकांनी तक्रार नोंदविल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात असून, बिल दुरुस्तीसाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. नागरिकांना हे परवडणारे नाही; त्यांची सरळसरळ पिळवणूक सुरू असा आरोप करण्यात आला.
भरत खाकाळ म्हणाले की, नागरिकांना योग्य व न्याय्य बिल देण्यासाठी तत्काळ तपासणी करून ठोस उपाययोजना करावी. विद्युत महावितरणकडून नगरकरांची पिळवणुक केली जात आहे. वाढीव बिलाच्या समस्या कायम राहिल्यास संपूर्ण शहरातील नागरिकांना घेऊन विद्युत भवन, अहिल्यानगर येथे मोठे आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिला.
महिला अध्यक्षा ॲड. विद्या शिंदे म्हणाल्या की, नगर शहरात दररोज दोन ते तीन वेळा वीजपुरवठा खंडित केला जातो.
दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात नागरिकांना त्रास नको, यासाठी वीज वितरणाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. सणासुदीच्या काळात वीज गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचे त्यांनी म्हंटले.
वारंवार वीज जाणे आणि वाढीव बिल या दुहेरी समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, दिवाळीपूर्वी लवकर महावितरणने पारदर्शक बिलिंग प्रणाली आणि अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणी आपच्या वतीने करण्यात आली आहे.
