मुंगसे ताईंना व्हीलचेअर व औषधांची भेट; खासदार शिंदेंकडून मानवी संवेदनशीलतेचे दर्शन
मुंबईतून हलली यंत्रणा दोन दिवसांत नेवासा येथील गावात पोहचली मदत
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एक फोन आणि मदतीचा हात थेट घरपोच! हे वाक्य अक्षरशः सत्य ठरले आहे. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ज्येष्ठ दिव्यांग महिला अनिताताई भाऊसाहेब मुंगसे यांची व्यथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचताच, फक्त दोन दिवसांत त्यांच्या घरी व्हीलचेअर सायकल आणि औषधांची किट पोहोचली.
23 सप्टेंबर रोजी अनिताताई यांनी यूट्यूबच्या माध्यमातून खासदार शिंदे यांचा नंबर मिळवला आणि थेट त्यांना फोन केला. अंगवळणी पडलेली हालअपेष्टांची कहाणी त्यांनी भावनिक शब्दांत मांडली. मी अपंग आहे, चालता येत नाही. मला घरकुल नाही, औषधे नाहीत, शासनाकडून कोणतेही मानधन मिळत नाही. आयुष्य जगणं कठीण झालंय!
ही व्यथा ऐकताच खासदार शिंदे यांनी क्षणाचा विलंब न लावता मदतीचे चक्र फिरवले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पर्सनल सेक्रेटरी डॉ. अमोल शिंदे यांना माहिती दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांचे अहिल्यानगरमधील स्वीय सहाय्यक डॉ. संतोष यादव यांना त्वरित मदत पोहोचविण्याची जबाबदारी सोपवली.
डॉ. यादव यांनी अनिताताईंचा पत्ता व गरज जाणून घेतली आणि शहरातून लगेचच व्हीलचेअर सायकल व औषधांचे किट घेऊन गावात दाखल झाले. गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत अनिताताईंच्या हातात ही मदत पोहोचली. त्याचवेळी नेवासा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांना संपर्क करून सरकारी मदत व घरकुल मिळवून देण्याचे आश्वासनही देण्यात आले.
याप्रसंगी गावात भावनिक वातावरण निर्माण झाले. आपल्या गावच्या वेशीवर थेट मुंबईतून खासदारांच्या मदतीचा हात पोहोचल्याचे पाहून ग्रामस्थ भारावून गेले. अनिताताईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. त्या म्हणाल्या खासदार साहेबांनी दिलेलं आश्वासन दोन दिवसांत पूर्ण झालं. आयुष्यभराच्या यातना आता थोड्या कमी होतील. आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मदतीत केमिस्ट असोसिएशनचे सुधीर लांडगे, अविनाश कार्डीले, संतोष दांगडे, राहुल भोर यांनी सहकार्य केले.