चर्मकार विकास संघ, रविदासिया फाउंडेशन व मा. आमदार सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम
विविध क्षेत्रातील गुणवंत, आदर्श शिक्षक व जीवन गौरव पुरस्काराने होणार सन्मान; समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ अहिल्यानगर, रविदासिया फाउंडेशन मुंबई व लोकनेते मा. आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील चर्मकार समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा रविवारी (दि. 21 सप्टेंबर) आयोजित करण्यात आला आहे. या गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील चर्मकार समाज एकवटणार आहे.
सकाळी 10 वाजता शहरातील टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे हा सोहळा होणार असून, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन गुणगौरव समितीचे संतोष कानडे, सुरेश शेवाळे, सुभाष सोनवणे, अरुण गाडेकर, विनोद कांबळे व रुपेश लोखंडे यांनी केले आहे.
या वर्षी समाजाच्या वतीने होणारा हा 12 वा गुणगौरव सोहळा असून, या कार्यक्रमात इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी, पदवीधर, अभियंते, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, एमपीएससी-यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे युवक-युवती तसेच समाजातील दोन ज्येष्ठ व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार आणि समाजातील आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी व समाजबांधवांनी आपले मार्कशीट, जातीचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो तसेच संबंधित कागदपत्रे दोन दिवसांत तालुका प्रतिनिधीकडे जमा करावे. गुणगौरव सोहळ्यात समाजबांधवांनी सहपरिवार उपस्थित राहून गुणवंतांचा सन्मान सोहळा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे म्हंटले आहे.