युवा एकसाथ फाउंडेशनचा उपक्रम
विद्यार्थ्यांनी उभा केला स्वातंत्र्य संग्रामातील अंगावर शहारे आणणारा स्वातंत्र्य लढा; तर देशभक्तीच्या गीतांवर रंगली नृत्य स्पर्धा
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा एकसाथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे व देशभक्तांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या वेशभूषा स्पर्धेतून अक्षरश: स्वातंत्र्य संग्रामातील अंगावर शहारे आणणारा स्वातंत्र्य लढा उभा राहिला होता. तर चिमुकल्यांनी सादर केलेल्या देशभक्तीच्या गीतांवर नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी वंदे मातरम…, भारत माता की जय…. च्या घोषाणे परिसर दणाणला. तर रक्तदान शिबिरात युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करुन देशभक्तीचे दर्शन घडविले.

वेशभूषा व नृत्य स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. तर रक्तदान करणाऱ्या युवक-युवतींचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, माजी नगरसेवक आप्पा नळकांडे, ॲड. युवराज शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सागर मुर्तडकर, योगेश ठुबे, डॉ. किरण वराळे, चंद्रकांत काळोखे, युवा एकसाथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित अशोक काळोखे, उपाध्यक्ष संदेश कानडे, सचिव साईराज चव्हाण, कार्याध्यक्ष ओंकार पागावाड, खजिनदार महेश साठे, प्रीती क्षेत्रे, सुमित भिंगारदिवे, राज जाधव, प्रिया घायतडक, हर्षल शिरसाठ, प्रितेश मोहिते, टेरी वाघमारे, वैभव गुढेकर, यश शेकटकर, मार्गदर्शक नितीन साठे, प्रदीप वाकचौरे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई आदी स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे व देशभक्तांचे पात्र विद्यार्थ्यांनी साकारुन आपल्या भाषणातून स्वातंत्र्य संग्रामातील इतिहासाला उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांसह पालक व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. संग्राम जगताप म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तांचा लढा न विसरता येणारा आहे. त्यांच्या त्याग व बलिदानाने आजची सुवर्ण पहाट उगवली आहे. इतिहास माहीत झाल्याशिवाय भविष्य घडविता येत नाही, आजच्या पिढीत देशभक्ती रुजविण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामाचा प्रेरक इतिहास ज्ञात असला पाहिजे. तर रक्तदान काळाची गरज बनली असून, युवा एकसाथ फाउंडेशनने घेतलेला उपक्रम दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित काळोखे म्हणाले की, दरवर्षी फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिन रक्तदानाने साजरा केला जातो. लहान मुलांमध्ये देशभक्ती रुजविण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेशभूषा आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांसह युवकांना दिशा देण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे व देशभक्तांची व्यक्तिरेखा विद्यार्थ्यांनी साकारली होती. वेशभूषा स्पर्धेत प्रथम- श्रेया आढाव, द्वितीय- आदेश जाधव, तृतीय- निर्भय भोसले, उत्तेजनार्थ- रिया नन्नवरे, आदिती दरंदले, तर नृत्य स्पर्धा प्रथम- आद्या त्रिपाठी, द्वितीय- सावी शहा, तृतीय- प्रेरणा सोनवणे, उत्तेजनार्थ- ऋतुजा चव्हाण, अल्फाज शेख यांनी बक्षिसे पटकाविली. यामधील विजेत्यांना अनुक्रमे एक हजार, सातशे, पाचशे व दोनशे रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले. वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य संदीप कांबळे व नृत्य स्पर्धेचे परीक्षण प्रिया ओगले-जोशी यांनी केले. रक्तदान शिबिरासाठी न्यू अर्पण ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. रक्तदान केलेल्या युवक-युवतींचा यावेळी फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा पाठक-रोडे यांनी केले. आभार साईराज चव्हाण यांनी मानले.
