सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण
संसाराचा गाडा चालवून शिक्षण घेणाऱ्यांचे भवितव्य उज्वल -पुष्पाताई बोरुडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवसा काम करुन रात्र शाळेत शिक्षण घेणाऱ्या सरस्वती मंदिर नाईट स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. बिकट परिस्थितीने शालेय जीवन हिरावल्यानंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमात धमाल केली. हिंदी-मराठी गाण्यावर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता. मुलींनी सादर केलेल्या लावणीने उपस्थित प्रेक्षक भारावले.

शहरातील जेल रोड येथील सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या सभागृहात मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई अनिल बोरुडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रमेश इनामकर, संस्थेचे मानद सचिव निलेश वैकर, शाळा समिती सदस्य अनिरुद्ध गीते, मुख्याध्यापक पांडुरंग गवळी, सुभेदार दिलीप जाधव, बाळासाहेब काकडे, वाकोडीचे उपसरपंच अमोल तोडमल, उदयभान खेडकर आदींसह माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, सदस्य व नाईट स्कूलचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी शाळेच्या आवारात असलेल्या कै. ग.ज. चितांबर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय शिक्षक प्रतिनिधी विणा कुऱ्हाडे व देवकर लबडे यांनी करून दिला. प्रास्ताविकात मुख्याध्यापक पांडुरंग गवळी म्हणाले की, जीवनात संघर्ष करुन रात्रीच्या अंधारात चमकणारे काजवे शिक्षणाच्या प्रवाहात येऊन आपले भवितव्य घडवत आहे. कुटुंब व्यवसाय सांभाळून शिक्षण घेत असलेल्या युवक व महिलांच्या जिद्दीला सलाम आहे. गुणवत्तापूर्ण व कौशल्यक्षम शिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम नाईट स्कूल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुष्पाताई बोरुडे म्हणाल्या की, संसाराचा गाडा चालवून शिक्षण घेणाऱ्या महिलांचे भवितव्य उज्वल आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सक्षम स्त्री घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचा पाया ठरत आहे. शिक्षणासह मुला-मुलींना जीवनात उभे करण्यासाठी नाईट स्कूलमध्ये दिले जाणारे कौशल्यपूर्ण शिक्षण प्रेरणादायी आहे. जगण्यासाठी फक्त पैसा हे साधन नसून, ज्ञान देखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर डोंगराची गोष्ट सांगून नकारात्मक विचार न करता जीवनात पुढे जाण्याचे त्यांनी आवाहन केले.
निलेश वैकर म्हणाले की, विविध क्षेत्रात रात्र शाळेचे विद्यार्थी चमकत आहेत. संस्थेत शिक्षणाबरोबर मुला-मुलींना कौशल्यक्षम शिक्षण देण्याचे काम केले जात आहे. घर सांभाळून नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जिद्द कौतुकास्पद असून, नाईट स्कूलबद्दल एक वेगळा जिव्हाळा असल्याचे त्यांनी सांगितले.

रमेश इनामकर यांनी ज्या शाळेत शिकलो, तेथे पाहुणे म्हणून बोलावणे ही अभिमानाची गोष्ट आहे. रात्र शाळेने समाजात उभे राहण्याचे बळ दिल्याचे त्यांनी सांगितले. उपसरपंच अमोल तोडमल म्हणाले की, शिक्षणासाठी वयाची अट नसते, कोणत्याही वयात घेतलेले शिक्षण आयुष्याला कलाटणी देते. जीवनात शिकण्याची वेळ परिस्थितीने हिरावली, मात्र ती वेळ पुन्हा आपण कष्टाने आणली असून, दुर्बल घटकांसाठी नाईट स्कूल एक उत्तम माध्यम ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या नाईट स्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विविध गीतांवर नृत्याचे बहारदार सादरीकरण करुन, विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांसमोर आपल्या नृत्याचे सादरीकरण केले. इनामकर यांनी नाईट स्कूलला आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास शिंदे यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा धारुरकर यांनी केले. आभार विणा कुऱ्हाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याणी पठाडे, राजू भुजबळ आदींसह शिक्षक, शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.