• Wed. Oct 15th, 2025

बेलापूर कंपनीच्या मालक, प्रशासन व व्यवस्थापनावर देखील सदोष मनुष्य वधाच्या गुन्हा दाखल व्हावा

ByMirror

Mar 22, 2025

कंपनीतील टाकी अंगावर पडून कामागाराचे झालेले मृत्यू प्रकरण; फक्त ठेकेदाराला दोषी धरुन झाला गुन्हा दाखल

कसबे कुटुंबीयांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

नगर (प्रतिनिधी)- बेलापूर कंपनी इंडिया लिमिटेड मध्ये अंगावर टाकी पडून 19 वर्षीय युवा कामगाराचा मृत्यू झालेला असताना कंपनीचे मालक, प्रशासन व व्यवस्थापन यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत युवकाच्या आईने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मनीषा कसबे, मीना जाधव, आनंद हिवाळे, बापू जाधव, निलेश भोसले, विलास जाधव, मार्कस जाधव आदी उपस्थित होते. पाण्याची टाकी हटविताना घडलेल्या दुर्घटनेत कंपनी प्रशासनाला पाठीशी घालून फक्त ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक पोलीस प्रशासन धनदांड्यांगाना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


मौजे हरेगाव (ता. श्रीरामपूर) या ठिकाणी बेलापूर कंपनी इंडिया लिमिटेड हा कारखाना आहे. या कंपनीत 60 ते 70 फुटापर्यंत असलेली तीन फ्लोअरची पाण्याची टाकी भंगारमध्ये काढून ते टाकी काढण्याचे काम रईस सय्यद यांना देण्यात आले होते. सय्यद यांनी या कामासाठी मयत युवक रुपेश कसबे यांच्यासह निलेश भोसले, बापू जाधव, मनोज पानसरे व शाहरुख यांना कामाला लावले होते. सदर काम कंपनी व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची काळजी व सुरक्षा न पुरविता कामगारांना टाकी काढण्यास लावली.


17 फेब्रुवारी रोजी टाकी काढण्यासाठी घरगुती गॅस व कटरच्या सहाय्याने काम सुरु करण्यात आले. टाकी कोणत्याही दिशेला पडली तरी मोठी दुर्घटना घडणार असल्याची जाणीव असून, सुध्दा कामगारांना मजूरांना डोक्याला हेल्मेट व आदी सुरक्षिततेचे साधन दिले गेले नाही. टाकी काढताना एकदाच पूर्णपणे खाली न घेता, क्रमाक्रमाने वेगळे करणे आवश्‍यक होते. अत्यंत बेजबाबदारपणे टाकी काढण्याचे काम सुरु होते. क्रेन आणि जेसीबी किंवा योग्य त्या यंत्राने टाकी पाडण्याऐवजी अशा प्रकारे सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून टाकी काढण्याचे काम सुरु केले गेले. दोरखंड टाकीला बांधून ट्रॅक्टरच्या सहाय्याने टाकीला ओढण्याचे काम सुरु करण्यात आले. 18 फेब्रुवारी रोजी पुन्हा ट्रॅक्टरच्या सहाय्याने टाकीला ओढण्याचे काम सुरु होते. वाहनासाठी असलेला लोखंडी जॅक ज्याची क्षमता फक्त 20 टन आहे. तो जॅक 50 टनाच्या पाण्याच्या टाकीसाठी वापरण्यात आला. टाकीचे गुंतलेले लोखंडी अँगल कट करताना रुपेश कसबे यांनी जॅक लावून टाकी उचलण्याचा प्रयत्न करीत असताना सुमारे 12:20 वाजल्याच्या सुमारास अचानक लोखंडी टाकीच्या खाली असलेल्या हौदाचा स्लॅप कोसळून लोखंडी टाकी जोरात खाली आली. मोठा आवाज होवून धुळीचे लोट उठले. त्यात रुपेशच्या डोक्यात लोखंडी पोल घुसून त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत इतर कामगार देखील जखमी झाले.


रुपेश हा मागील सहा महिन्यापासून मिळेल ते मजुरीचे काम करत होता. वडील अपंग व घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आणि बहिणीच्या लग्नासाठी झालेले कर्ज फेडण्यासाठी तो कुटुंबाला हातभार लावत होता. अशा परिस्थितीमध्ये त्याचा दुर्देवी अंत झाला. पहिल्या दिवसापासून रुपेशचे कुटुंबीय श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणात कंपनीला जबाबदार धरुन कंपनीचे मालक, प्रशासन व व्यवस्थापन यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती. मात्र फक्त ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. राजकीय दबावापोटी धनदांडग्या व्यक्तींना पाठिशी घालण्यासाठी पोलीस प्रशासन दखल घेत नसून, कंपनीचे मालक, प्रशासन व व्यवस्थापन यांचा देखील गुन्ह्यात समावेश करावा, गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर पोलीस स्टेशन यांच्याकडून काढून एलसीबी अथवा सीआयडी कडे सोपवून न्याय मिळण्याची मागणी कसबे कुटुंबीयांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *