• Thu. Apr 24th, 2025

महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघ व कुंभार समाज संघटनेच्या वतीने 2 एप्रिल रोजी उपोषणाचा इशारा

ByMirror

Mar 26, 2025

श्री क्षेत्र तेर येथील श्री संत गोरोबा काकांचे मंदिराची प्रास्तावित कमानची जागा बदलण्याची मागणी

शासन स्तरावर प्रश्‍न सोडविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघ व कुंभार समाज संघटना अहिल्यानगरच्या वतीने श्री क्षेत्र तेर (जि. धाराशिव) येथील श्री संत गोरोबा काकांचे मंदिराची प्रास्तावित कमानची (महाद्वार) जागा बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. शासकीय स्तरावर हा प्रश्‍न न सुटल्यास जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांच्या वतीने 2 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघ व कुंभार समाज संघटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन दिले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सोनवणे, सरचिटणीस विनायक राऊत, जिल्हाध्यक्ष नितीन घोडके, पांडुरंग क्षीरसागर, गणेश डेंगळे, कैलास राऊत, भगवान खटावकर, रवी देशमुख, कुमार सुसरे, सागर राजापुरे, नितीन राजापुरे, संतोष मेहेत्रे, विठ्ठलराव मोरे, भरत जगदाळे, भानुदास गोरे, सुभाष जोर्वेकर, विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.


मौजे तेर (जि. धाराशिव) येथील श्री संत गोरोबाकाका व शिवमंदिर ट्रस्टचे परिसरात पाण्याच्या टाकीजवळ (महाद्वार) कमानच्या कामाचे उद्घाटन आ. राणा जगजीतसिंह पाटील यांनी केले आहे. परंतु या ठिकाणी पाण्याची टाकी व पुढील जागा शिल्लक आहे. त्यामुळे ती कमान मुरुड रस्त्यालगत जागेत करण्यात यावी, अशी मागणी अहिल्यानगर कुंभार समाजच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच श्री संत गोरोबा काकांच्या जुने मंदिराचे पूर्व बाजूच्या भिंतीचे काम अनेक वर्षापासून अद्याप पर्यंत झालेले नाही. त्यामुळे जे महाद्वाराचे काम आहे ते काम दक्षिण बाजूस न करता पूर्व बाजूस करावे. पूर्व द्वारातून बाहेर आल्यानंतर समोरच मागे पत्रव्यवहार करून सुद्धा शौचालयाचे काम मंदिराच्या पूर्व बाजूस केलेले आहे, तरी ते शौचालय पाडण्यात येऊन ते मंदिराच्या दक्षिण बाजूस करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


या मागणीसाठी धाराशिव येथे माजी सरपंच महादेवजी खटावकर 2 एप्रिल रोजी आमरण उपोषणासाठी बसणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ व सर्व कुंभार समाज अहिल्यानगरच्या वतीने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *