निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
अवैध दारू विक्रेत्यांना ग्रामपंचायतीने बजावल्या नोटीस
नगर (प्रतिनिधी)- तांदळी दुमाला (ता. श्रीगोंदा) येथील अवैध दारू धंदे बंद होण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना महिला व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. सरपंच संजय अण्णा निगडे यांच्या नेतृत्वाखाली गावातील शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन अवैध दारूचा गंभीर प्रश्न मांडला. यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र भोस, पोलीस पाटील अनिल शेळके, माजी उपसरपंच महेश भोस, ग्रामपंचायत सदस्य भरत शेळके, आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, हरिभाऊ धावडे, आप्पा हराळ, संजय भागवत, मीना नवले, संजना धावडे, रेखाबाई घाडगे, प्रियंका बडे, रुक्मिणी बडे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.
तांदळी दुमाला (ता. श्रीगोंदा) येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. युवक व्यसनाच्या आहारी जात असल्याने त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. दारुच्या व्यसनाने मरण पावलेल्या व्यक्तीच्या पत्नींना विधवेचे जीवन जगावे लागत आहे. जागतिक महिला दिनी विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करुन गावात दारूबंदी करण्याबाबत ठराव पारीत करण्यात आला आहे. तर रणरागिणींनी आक्रमक होत अवैध दारू अड्डयाची तोडफोड देखील केली होती. तरी देखील गावात छुप्या पध्दतीने दारु विक्री सुरुच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सदरील अवैध दारू बंदी करण्यासाठी श्रीगोंदा तहसीलदार, पोलीस निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांना देण्यात आले आहे. श्रीगोंदयाच्या तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पत्र दिले असून दारुबंदी विभागाने तातडीची कारवाई करण्याबाबत आश्वासित केले, तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या अवैध दारू विक्रेत्यांच्या नावाची माहिती घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फोन करुन कारवाईच्या सूचना दिल्या. ग्रामपंचायत अवैध दारूबंदीसाठी आक्रमक असून शासन स्तरावरून नक्कीच कारवाई होण्याच्या अपेक्षा लागल्या आहेत.
अवैध दारू विक्रेत्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून नोटीस बजावली असताना त्यातील तिघांनी नोटीस स्वीकारली आहे. दोघांनी नोटीस घेतली नसल्याने त्यांच्या घराला नोटीस डकावणी करण्यात आलेली आहे. जर अजूनही अवैध दारू विक्री बंद केली नाही, तर प्रत्यक्ष नावानिशी तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करून वेळप्रसंगी आंदोलन केले जाणार -संजय अण्णा निगडे (सरपंच, तांदळी दुमाला ता. श्रीगोंदा)